इक्वाडोरमधल्या भूकंपात २३३ जणांचा मृत्यू
By admin | Published: April 17, 2016 09:50 AM2016-04-17T09:50:02+5:302016-04-17T22:01:21+5:30
दक्षिण अमेरिकेतल्या इक्वाडोर या देशामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत या भीषण आपत्तीत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
अमेरिका, दि. १७- दक्षिण अमेरिकेतल्या इक्वाडोर या देशामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत या भीषण आपत्तीत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. 7.8 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसल्यानं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. इक्वाडोरमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
मी टीव्हीवर चित्रपट पाहत असताना अचानक सगळं हलण्यास सुरुवात झाली. आम्ही लागलीच घरातून रस्त्यावर धावलो. काय होईल मला माहिती नव्हतं, असा अनुभव क्विटोतल्या लोरेना कझारेस यांनी सांगितला. या महाभयंकर भूकंपामुळे शहरातला एक पूलही कोसळला आहे. मंता शहरातल्या विमानतळावरचा टॉवरही कोसळला आहे.
अनेक ठिकाणी टेलिफोनचे पोल कोसळून संपर्क तुटला आहे. सध्या लोक व्हॉट्सअपमुळे एकमेकांच्या संपर्कात आहेत. एका शॉपिंग मॉलमधल्या भिंतीलाही तडे गेले आहेत. या भूकंपामुळे एक्वेडोर शहराचं मोठं नुकसान झालं आहे. एक्वेडोर शहराला सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.