राजा-राणीवर फेकली अंडी...हल्लेखोराला अटक, गुलामांचे रक्त शोषून ब्रिटनने प्रगती केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 07:46 AM2022-11-11T07:46:08+5:302022-11-11T07:46:29+5:30
ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय व राणी कॅमिला पार्कर यांच्यावर यॉर्कशायर येथे एका युवकाने (२३ वर्षे) पाच अंड्यांचा मारा केला.
लंडन :
ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय व राणी कॅमिला पार्कर यांच्यावर यॉर्कशायर येथे एका युवकाने (२३ वर्षे) पाच अंड्यांचा मारा केला. या देशाची प्रगती गुलामांचे रक्त शोषून झाली आहे, अशी घोषणा हा युवक देत होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ब्रिटनच्या राजांवर झालेल्या अंड्यांच्या माऱ्याने खळबळ उडाली आहे.
किंग चार्ल्स तृतीय व राणी कॅमिला एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यॉर्कशायर येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. गीत सुरू असताना या दोघांवर अंड्यांचा मारा करण्यात आला. या घटनेने अजिबात विचलित न होता किंग चार्ल्स तृतीय व राणी कॅमिला यांनी लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली.
राणी एलिझाबेथ यांच्यावरही झाला होता अंड्यांचा मारा
राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे यंदा दि. ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यानंतर प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या राजेपदावर विराजमान झाले. १९८६ साली दस्तुरखुद्द राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावरही दोन महिलांनी अंड्यांचा मारा केला होता. त्या आपले पती प्रिन्स फिलिप यांच्या समवेत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेले असताना ही घटना घडली होती.
हल्लेखोर आहे डाव्या विचारसरणीचा
- किंग चार्ल्स तृतीय यांच्यावर अंड्यांचा मारा करणाऱ्या युवकाचे नाव पॅट्रिक थेलवेल असे असूून, तो डाव्या विचारसरणीचा आहे.
- या युवकाने पोलिसांना सांगितले की, मी गुलामगिरी, वसाहतवाद, साम्राज्यवाद या गोष्टींनी त्रस्त झालेल्या लोकांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यासाठी राजा व राणीवर अंडी फेकली.
- अनेक लोकांच्या त्याग, बलिदानामुळे किंग चार्ल्स तृतीय हे राजेपदापर्यंत पोहोचले आहेत. त्याची त्यांना अजिबात जाणीव नाही.