Egypt Church Fire: इजिप्तमध्ये चर्चला भीषण आग; चेंगराचेंगरीत लहान मुलांसह किमान 41 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 05:47 PM2022-08-14T17:47:44+5:302022-08-14T17:48:37+5:30
Egypt Church Fire: आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्राथमिक तपासात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
Egypt Church Fire: इजिप्तमध्ये एका चर्चला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन, 41 जणांचा मृत्यू झाला आहे. इजिप्तच्या कॉप्टिक चर्चने दिलेल्या माहितीनुसार, कैरोमधील चर्चला आग लागल्याने किमान 41 लोक ठार झाले आणि 14 जखमी झाले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्राथमिक तपासात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
Egypt's Coptic Church, citing health officials, says fire at Cairo church kills at least 41 people, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) August 14, 2022
सविस्तर माहिती अशी की, इजिप्तची राजधानी कैरो येथील कॉप्टिक ख्रिश्चन चर्चमध्ये रविवारी भीषण आग लागून 41 जणांचा मृत्यू झाला. अधिकार्यांनी सांगितले की, कैरोच्या वायव्येकडील कामगार-वर्गीय जिल्हा इंबाबाबा येथील अबू सिफायन चर्चमध्ये भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांच्या तपासात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. रविवारी सकाळी कॉप्टिक ख्रिश्चन समाजाची बैठक सुरू असताना आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.
कॉप्टिक ख्रिश्चन कोण आहेत?
कॉप्टिक ख्रिश्चन हा मध्य पूर्वेतील सर्वात मोठा ख्रिश्चन समुदाय आहे. यांची लोकसंख्या इजिप्तच्या 103 दशलक्ष लोकांपैकी किमान 10 दशलक्ष आहे. कॉप्टिक ख्रिश्चनांना अनेकदा हल्ले आणि भेदभावाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, इजिप्तमध्ये गेल्या काही वर्षात अनेक आगीच्या घटना घडल्या आहेत. मार्च 2021 मध्ये कैराच्या पूर्व उपनगरात एका कपड्याच्या कारखान्याला आग लागून 20 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी, 2020 मध्ये दोन रुग्णालयांना आग लागल्याने 14 कोविड-19 रुगणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.