इजिप्त पाकिस्तानकडून जेएफ-१७ विकत घेण्यास इच्छुक
By admin | Published: December 5, 2015 02:58 PM2015-12-05T14:58:46+5:302015-12-05T20:50:12+5:30
इजिप्तने पाकिस्तानने चीनच्या सहकार्याने विकसित केलेले जेएफ-१७ थंडर लढाऊ विमान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ५ - पाकिस्तानचे संरक्षण उत्पादनमंत्री राणा तनवीर हुसैन आणि इजिप्तचे राजदूत शेरीफ शाहीन यांच्यामध्ये झालेल्या भेटीच्यावेळी पाकिस्तानकडून जेएफ-१७ थंडर लढाऊ विमान खरेदी करण्याची इच्छा इजिप्तने व्यक्त केल्याचे वृत्त येथील एका दैनिकाने दिले आहे.
पाकिस्तानचे संरक्षण उत्पादनमंत्री राणा हुसैन आणि इजिप्तचे राजदूत शेरीफ शाहीन यांची बैठक झाली. यावेळी पाकिस्तानने चीनच्या सहकार्याने विकसित केलेले जेएफ-१७ थंडर लढाऊ विमान खरेदी करण्याच्या विचार करत असल्याचे इजिप्तचे राजदूत शेरीफ शाहीन यांनी सांगितले. तसेच, इजिप्तची पाकिस्तानबरोबर संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची इच्छा आहे. इजिप्तचे शिष्टमंडळ लवकरच पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रे निर्मिती कारखान्यांची पाहणी करुन काही नवी शस्त्रास्त्रे पाकिस्तानकडून विकत घेणार असल्याचेही शेरीफ शाहीन यांनी सांगितले.