ईद नमाजींवर हल्ला !
By admin | Published: July 8, 2016 05:02 AM2016-07-08T05:02:33+5:302016-07-08T05:02:33+5:30
१ जुलैच्या भीषण दहशतवादी हल्ल्यातून पुरते सावरत नाही तोच गुरुवारी पुन्हा बांगलादेश कट्टरपंथींनी केलेल्या हल्ल्याने हादरला. ईदनिमित्त किशोरगंज जिल्ह्यातील शोलकिया
ढाका : १ जुलैच्या भीषण दहशतवादी हल्ल्यातून पुरते सावरत नाही तोच गुरुवारी पुन्हा बांगलादेश कट्टरपंथींनी केलेल्या हल्ल्याने हादरला. ईदनिमित्त किशोरगंज जिल्ह्यातील शोलकिया येथे दोन लाखांहून अधिक लोक नमाज पढत असताना दहशतवाद्यांनी तिथे बॉम्ब फेकून बेछूट गोळीबारही केला. बॉम्बस्फोटानंतर पोलीस आणि दहशतवाद्यांदरम्यान उडालेल्या चकमकीने हा परिसर थरारला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिसांसह चार जण ठार झाले, तर पोलिसांनी एका दहतवाद्याचा खात्मा केला.
बांगलादेशातील शोलकिया येथे ईदच्या प्रार्थनेसाठी जवळपास २० हजार लोक जमले होते. या प्रार्थनास्थळानजीकच हा हल्ला करण्यात आला. दोन पोलीस ठार, तर अन्य १३ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असताना एक गोळी झरनाराणी भौमिक या हिंदू महिलेला लागली आणि तीही मरण पावली. बॉम्बहल्ला झाल्याचे कळताच घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी शिताफीने या परिसराची नाकेबंदी करून मोर्चा सांभाळत हल्लेखोरांशी मुकाबला केला.
दोन संशयित हल्लेखोर जेरबंद
दोन संशयित हल्लेखोरांना जेरबंद करण्यात आले असून, १३ जण जखमी झाले आहेत. अतिरेक्यांना पकडण्यासाठी आसपासच्या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, असे किशोरगंजचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबू सायेम यांनी सांगितले.
सहा ते सात सशस्त्र हल्लेखोरांनी पोलिसांवर एकदम हल्ला केला. हे पोलीस प्रार्थनास्थळी जाणाऱ्या लोकांची तपासणी करीत होते. नमाजाच्या ठिकाणाच्या जवळच फेकण्यात आलेला बॉम्ब गावठी होता, असा प्राथमिक अंदाज आहे.
एनएसजी पथक बांगलादेशला जाणार
नॅशनल सिक्युरिटी गार्डचे (एनएसजी) एक पथक शुक्रवारी बांगलादेशला रवाना होणार आहे. ढाक्यात एका रेस्टॉरंटमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अभ्यास आणि विश्लेषण करण्यास हे पथक जाणार आहे. या पथकात अतिरेकी विरोधी अभियानातील एनएसजीच्या तज्ज्ञांचा समावेश आहे.
‘ते’ मानवतेचे दुश्मन - शेख हसीना
ईदच्या प्रार्थनेच्या वेळी हल्ला करणारे मानवतेचे दुश्मन आहेत, असे पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे. ढाक्यातील रेस्टॉरंटवर हल्ला करणारे युवक काही महिन्यांपासून बेपत्ता होते. तेव्हा पालक आणि शाळांनी बेपत्ता मुलांबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा शोध घेतला जाईल. तसेच आवश्यकतेनुसार त्यांच्यावर उपचारही केले जातील.