...अन् १३३ वर्षांचा आयफेल टॉवर आठवड्याभरात वीस फुटांनी उंच झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:18 AM2022-03-22T05:18:31+5:302022-03-22T05:20:44+5:30

गेल्या काही वर्षांपर्यंत १०६३ फूट असलेली या टॉवरची उंची या आठवड्यात एकदम वीस फुटांनी वाढल्यानं ती आता १०८३ फूट झाली आहे! 

Eiffel Tower height raised by 6 metres Watch video of technicians adding an antenna | ...अन् १३३ वर्षांचा आयफेल टॉवर आठवड्याभरात वीस फुटांनी उंच झाला

...अन् १३३ वर्षांचा आयफेल टॉवर आठवड्याभरात वीस फुटांनी उंच झाला

googlenewsNext

आयफेल टॉवर.. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ही एक जगप्रसिद्ध वास्तू. आयफेल टॉवर ऐकूनही माहीत नाही, अशी व्यक्ती जगातही सापडणं मुश्कील. १८८९ मध्ये तयार झालेला आयफेल टाॅवर केवळ फ्रान्सचंच सांस्कृतिक वैभव नाही, तर अख्ख्या जगाच्या दृष्टीनं आजही ते एक आश्चर्य मानलं जातं. फ्रान्सला गेलेला कोणताही पर्यटक आयफेल टॉवर पाहिल्याशिवाय परतत नाही, अशी या टॉवरची ख्याती आहे.

आयफेल टॉवर अनेकदा अनेक कारणांनी चर्चेत असतो. कुणी रसिक आयफेल टॉवरवर जाऊन लग्न करतात, तर आयफेल टॉवर कलल्याच्या बातम्याही अनेकदा कानावर येतात, पण तब्बल १३३ वर्षे झाली तर आयफेल टॉवर आजही तसाच उभा आहे आणि जगभरच्या रसिकांना तोंडात बोट घालायला लावतोय.

यावेळी आयफेल टॉवर पुन्हा एकदा चर्चेत आहे; पण तो एका वेगळ्याच कारणानं. काही दिवसांपूर्वीच या आयफेल टॉवरची उंची तब्बल वीस फुटांनी (सहा मीटर) वाढल्यामुळे जगात तो पुन्हा चर्चेचा विषय झाला आहे.

तशी याआधीही या टॉवरची उंची वाढली आहे! ज्यावेळी हा टॉवर तयार झाला, त्यावेळी त्याची उंची होती १०२४ फूट (सुमारे ३१२ मीटर), पण गेल्या १३३ वर्षांत या टॉवरची उंची तब्बल ६० फुटांनी वाढली आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत १०६३ फूट असलेली या टॉवरची उंची या आठवड्यात एकदम वीस फुटांनी वाढल्यानं ती आता १०८३ फूट झाली आहे! 

आयफेल टॉवरची रचना अतिशय मजबूत अशा लोखंडाच्या साहाय्यानं करण्यात आली आहे. त्यामुळे या टॉवरला ‘आयर्न लेडी’ असंही म्हटलं जातं! 
पण या आयर्न लेडीची उंची का वाढते आहे? आता परत अचानक ती कशी काय वाढली? - आयफेल टॉवरवर नुकताच एक रेडिओ ॲण्टेना बसविण्यात आला. तंत्रज्ञानाच्या विस्तारीकरणासाठी वैज्ञानिकांनी हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं नुकताच हा ॲण्टेना बसविला. या ॲण्टेनामुळे आयफेल टॉवरची उंची वाढली आहे.

गुस्ताव आयफेल यांनी १९८९ मध्ये या टॉवरची उभारणी केली होती. त्यांच्या नावावरूनच या टॉवरला आयफेल असं नाव देण्यात आलं होतं. ज्यावेळी टॉवर तयार झाला, त्यावेळी ती जगातील सर्वाधिक  उंच रचना  होती.

आयफेल यांनी १९८९ मध्ये टॉवर उभारला त्यावेळी केवळ वीस वर्षांसाठीच तो अस्तित्वात ठेवण्यात येणार होता. नंतर तो नष्ट करण्यात येणार होता; पण हा टॉवर तयार झाल्यापासूनच जगभरातल्या पर्यटकांनी त्याला इतकी पसंती दिली आणि वैज्ञानिक दृष्टीनंही तो खूप उपयुक्त ठरू लागल्याने हा टॉवर एक वैश्विक वारसा म्हणून जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘द आयफेल टॉवर’ कंपनीचे प्रेसिडेंट जीन फ्रॅन्कॉइस मार्टिन्स यांनी यासंदर्भात गौरवानं म्हटलं आहे की, गेल्या १३३ वर्षांच्या काळात या ‘आयर्न लेडी’ची केवळ उंचीच वाढली नाही, तर वैज्ञानिक प्रगतीतही या ‘लेडी’नं मोठा हातभार लावला आहे. आजपर्यंत जेवढ्या म्हणून रेडिओ टेक्नॉलॉजी आल्या, त्यांचा विकास झाला, त्या प्रत्येक विकासात या आयर्न लेडीचा हातभार आहे. दशकानुदशके विज्ञानाचा हात धरून ही आयर्न लेडी विज्ञानाची, स्वत:ची आणि जगाचीही उंची वाढवते आहे. 

आयफेल टॉवरच्या उभारणीस २६ जानेवारी १८८७ ला सुरुवात झाली होती. त्याच्या निर्माणासाठी तीनशे मजूर दोन वर्षे, दोन महिने आणि पाच दिवस रात्रंदिवस मेहनत घेत होते. ३१ मार्च १९८९ ला या टॉवरचं उद्घाटन झालं आणि सहा मे १९८९ पासून पर्यटकांसाठी तो खुला करण्यात आला.
पर्यटकांसाठी वर्षाचे बाराही महिने, ३६५ दिवस तो खुला असतो. तिकीट काढून ज्या वास्तू, जी ऐतिहासिक स्थळं पाहण्यासाठी खुली केली जातात, त्यात आयफेल टॉवर जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आजवर जगातल्या सर्वाधिक लोकांनी तिकीट काढून आयफेल टॉवरचं दर्शन घेतलं आहे.
दरवर्षी लाखो पर्यटक आयफेल टॉवर पाहण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची दरवर्षीची सरासरी साधारण ७० लाख आहे. २००७ मध्ये तब्बल सत्तर लाख पर्यटकांनी आयफेल टॉवरला भेट दिली होती. तेव्हापासून पर्यटकांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे.

रात्री दोनपर्यंत चमकतो टॉवर! 
आयफेल टॉवरला दरवर्षी किती पर्यटक भेट देतात, यासंदर्भात २००९ मध्ये एक व्यापक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यावेळच्या अभ्यासानुसार जे लोक आयफेल टॉवर पाहण्यासाठी येत होते, त्यात तब्बल ७५ टक्के प्रवासी परदेशी होते. या ७५ टक्क्यांतही ४३ टक्के पर्यटक पश्चिम युरोपातले होते. यात आता आणखी वाढ झाली आहे. आयफेल टॉवरला दररोज रात्री प्रकाशमान केलं जातं. दररोज रात्री एक वाजेपर्यंत ही रोशनाई सुरू असते. उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र रात्री दोनपर्यंत हा टॉवर चमकत असतो. अगदी लांबवरूनही हे रम्य दृश्य दिसावं म्हणून ही योजना करण्यात आली आहे.

Web Title: Eiffel Tower height raised by 6 metres Watch video of technicians adding an antenna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.