हेरगिरीचा आरोप: कतारमध्ये आठ माजी भारतीय नौसैनिकांना मृत्युदंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 08:33 AM2023-10-27T08:33:39+5:302023-10-27T08:34:25+5:30
शिक्षा धक्कादायक, कायदेशीर मार्ग काढू: भारत सरकार
दोहा/कतार : कतारमधील न्यायालयाने आठ माजी भारतीय नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. ते गेल्या एक वर्षापासून तुरुंगात कैद आहेत. ही शिक्षा अत्यंत धक्कादायक असून, त्यांची सुटका करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधले जात आहेत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आठ भारतीयांवर नेमके काय आरोप आहेत, हे कतार सरकारने सार्वजनिक केलेले नाहीत.
काय आहे आरोप?
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी इस्रायलसाठी त्यांच्या देशाची हेरगिरी करत असल्याचा दावा कतारच्या स्थानिक माध्यमांनी केला आहे. मात्र, यात किती तथ्य आहे हे समाेर आले नाही.
‘ते’ आठ अधिकारी नेमके कोण?
कतारमध्ये ज्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांच्यामध्ये कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश यांचा समावेश आहे.
भारत सरकारचे म्हणणे काय?
कतारच्या कनिष्ठ कोर्टाने अल दाहरा कंपनीच्या आठ भारतीय कर्मचाऱ्यांशी संबंधित खटल्यात आपला हा निर्णय दिला आहे. आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहोत, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
सरकारला नव्हती अटकेची माहिती
कतारच्या गुप्तचर संस्थेच्या राज्य सुरक्षा ब्युरोने ३० ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना अटक केली. मात्र, सप्टेंबरच्या मध्यात भारतीय दूतावासाला अटकेची माहिती देण्यात आली होती. ३० सप्टेंबर रोजी त्यांना आपल्या कुटुंबांसोबत काही वेळ फोनवर बोलण्याची परवानगी दिली नव्हती.