‘एच-१ बी’ व्हिसाला आठ महिन्याची मुदतवाढ, भारतीयांना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 03:06 AM2020-04-16T03:06:28+5:302020-04-16T03:06:40+5:30
अमेरिकेचा निर्णय : भारतीयांना फायदा
वॉशिंग्टन : कोरोनाच्या साथीमुळे अमेरिकेतील स्थलांतरितांसमोर निर्माण झालेल्या समस्यांची जाण ठेवून ‘एच-१ बी’ व्हिसाची मुदत आठ महिन्यांनी वाढविण्यास परवानगी देण्याचा निर्णय अमेरिकी सरकारने घेतला आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा अमेरिकेत काम करणारे भारतीय आयटी इंजिनिअर व बी१/बी२ प्रकारच्या व्हिसावर त्या देशात गेलेल्या व कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय पर्यटकांनाही होणार आहे.
अमेरिकेमध्ये एच-१बी व्हिसाधारकांपैकी एकतृतीयांश लोक भारतीय आहेत. तिथे काम करणारे व एच-१ बी’ व्हिसाची मुदत संपत आलेले भारतीय आयटी इंजिनिअर व अन्य नोकरदार या निर्णयामुळे खूश झाले आहेत. कोरोनाच्या साथीमुळे अमेरिकेत वाहतूक तसेच संचारावर निर्बंध लादण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह स्थलांतरितांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हेही लक्षात घेऊन मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. नॅसकॉम या संघटनेच्या जागतिक व्यापार विभागाचे उपाध्यक्ष शिवेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने एच-१ बी’ व्हिसाच्या मुदतवाढीबद्दल निर्णय घेतला आहे.
नोकरी शोधासाठी उसंत
कोरोनाच्या संकटकाळात अमेरिकेत ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांना व्हिसामध्ये मुदतवाढ मिळवून नवी नोकरी शोधण्याची उसंत मिळणार आहे. या देशात एच-१ बी व्हिसा मिळण्याचे नियम आणखी कडक करण्यात आले होते. अमेरिका व अमेरिकी नागरिकांना प्राधान्य या धोरणानुसार डोनाल्ड ट्रम्प सरकारने हे पाऊल उचलले होते.