आठ वर्षांच्या मुलाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण
By admin | Published: July 30, 2015 04:13 AM2015-07-30T04:13:23+5:302015-07-30T04:13:23+5:30
अमेरिकेत एका आठ वर्षांच्या मुलाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले असून, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे फिलाडेल्फिया येथील मुलांच्या रुग्णालयाने जाहीर केले आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेत एका आठ वर्षांच्या मुलाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले असून, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे फिलाडेल्फिया येथील मुलांच्या रुग्णालयाने जाहीर केले आहे.
बाल्टीमोरचा झियान हार्वे याच्यावर शल्यचिकित्सकांनी १० तास ही शस्त्रक्रिया केली. त्याला संसर्गाचा गंभीर आजार झाल्याने त्याचे दोन्ही हात व पावले कापावी लागली होती व मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करावे लागले होते. इतक्या वेदनानंतरही हसतमुख असणाऱ्या झियानने हाताशिवाय खाणे, लिहिणे व व्हिडिओ गेम्स खेळणेही शिकून घेतले होते. आता आपल्या हाताने फुटबॉल फेकण्याचे स्वप्न तो पाहत आहे. प्लास्टिक सर्जरी व पुनर्रचना करणारे ४० डॉक्टर, इतर कर्मचारी, हाडांची शस्त्रक्रिया करणे, भूल देणे व रेडिओलॉजी या टप्प्यातून ही शस्त्रक्रिया करण्यासाठी उपस्थित होते.
अशी झाली शस्त्रक्रिया
सर्जन (शल्यचिकित्सक) डॉक्टरांनी प्रथम हाडे जोडली. मग रक्तवाहिन्या जोडल्या, एकदा रक्त वाहू लागल्यानंतर स्नायू व नसा जोडण्यात आल्या. संसर्गानंतर झियानच्या मूत्रपिंडाचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे तो प्रत्यार्पण करून घेण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांच्या यादीत होता. शरीराने अवयव नाकारू नये यासाठी औषधे तो आधीपासून घेतो आहे असे फिलाडेल्फिया रुग्णालयाचे डॉ. बेंजामिन चांग यांनी सांगितले.
काही आठवड्यांत घरी
झियान हार्वे नवे अवयव शरीराने नाकारू नयेत म्हणून औषधे घेत आहे.
त्याच्या बाल्टिमोरमधील घरी तो आणखी काही आठवड्यांनंतर जाऊ शकेल असे डॉक्टरांनी म्हटले आहे. ही शस्त्रक्रिया म्हणजे वर्षानुवर्षे घेतलेल्या प्रशिक्षणाचा, काही महिने केलेल्या नियोजनाचा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने केलेल्या तयारीचा परिपाक होता असे एल स्कॉट लेविन यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)