पृथ्वीवर 381 वर्षांनी सापडला आठवा खंड; 'हे' असेल नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 06:25 AM2023-09-28T06:25:29+5:302023-09-28T06:26:36+5:30
नाव : झिलँडिया; ९४% भूभाग पाण्याखाली
वॉशिंग्टन : ३८१ वर्षांनंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी जगातील आठवा खंड शोधला आहे. त्याचा बहुतांश भूभाग समुद्राच्या पाण्याखाली असल्याने तो दिसू शकत नव्हता. या आठव्या खंडाला झिलँडिया किंवा ते रिऊ-ए-मोई या नावांनी संबोधण्यात येते. जगात आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक असे सात खंड असल्याचे मानले जात होते; पण आता त्यात या नव्या खंडाची भर पडली आहे.
न्यूझीलंड येथील जीएनएस सायन्स या संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ अँडी टुलोच यांचा झिलँडिया खंड शोधण्याच्या मोहिमेत सहभाग होता.
शोधायला ३८१ वर्षे का लागली?
जगामध्ये झिलँडिया नावाचा आठवा खंड आहे असे निरीक्षण डच व्यापारी व खलाशी अबेल तस्मान याने १६४२ साली नोंदविले होते. दक्षिणेकडील मोठा खंड शोधण्याच्या मोहिमेवर तो निघाला होता. न्यूझीलंडमध्ये स्थानिक लोकांनी तस्मानला त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या निरीक्षणानंतर झिलँडियाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब होण्यासाठी ३८१ वर्षे लागली.
कसा आहे झिलँडिया ?
n झिलँडियाचे क्षेत्रफळ ४९ लाख किलोमीटर असून त्याचा आकार मादागास्करपेक्षा सहा पट मोठा आहे.
n झिलँडिया हा जगातील सर्वांत लहान, निमुळता व सर्वांत कमी वयोमान असलेला खंड आहे. त्याचा ९४ टक्के भूभाग हा समुद्राच्या पाण्याखाली असल्याने फक्त काही बेटे समुद्रपातळीपेक्षा उंचीवर आहेत.
५५ कोटी वर्षांपूर्वी झाली निर्मिती
येथील दगडांच्या अभ्यासातून झिलँडिया हा गोंडवाना या प्राचीन महाखंडाचा एक भाग होता. ५५ कोटी वर्षांपूर्वी त्याची निर्मिती झाली होती.