त्रेतायुगात हनुमानाने लंका जाळली, आता कलियुगात एका माकडाने श्रीलंकेत अंधार केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 18:21 IST2025-02-09T18:19:11+5:302025-02-09T18:21:15+5:30
Electricity Blackout in Sri Lanka: एका माकडामुळे संपूर्ण श्रीलंका अंधारात बुडाला.

त्रेतायुगात हनुमानाने लंका जाळली, आता कलियुगात एका माकडाने श्रीलंकेत अंधार केला
Electricity Blackout in Sri Lanka: आत्तापर्यंत तुम्ही अनेकदा माकडांनी धुडगूस घातल्याच्या घटना ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. पौराणिक मान्यतेनुसार त्रेतायुगात हनुमानाने रावणाची सुवर्ण लंका जाळली होती. आता अशीच एक घटना श्रीलंकेत घडली आहे. एका माकडामुळे संपूर्ण देश अंधारात बुडाला. म्हणजेच, एका माकडामुळे संपूर्ण देशाचा वीजपुरवठा खंडित झाला.
माकडामुळे तीन तास वीज खंडित
श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कुमार जयकोडी यांनी सांगितले की, रविवारी (9 फेब्रुवारी 2025) दक्षिण कोलंबोमधील ग्रिड ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात एक माकड आले, ज्यामुळे संपूर्ण यंत्रणा बिघडली. यामुळे संपूर्ण देशात तीन तास वीज खंडित झाली होती. सकाळी 11.30 वाजेपर्यंत देशातील अनेक भागांत वीजपुरवठा पूर्ववत झाला.
विशेष म्हणजे, श्रीलंकेत वीजपुरवठा खंडित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्ये, जेव्हा देश आर्थिक संकटातून जात होता, तेव्हा श्रीलंकेत अनेक महिने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये निदर्शने झाली होती.
2022 मध्ये श्रीलंकेतील लोकांना 10-10 तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला होता. याचा तेथील बाजारपेठांवर खूप वाईट परिणाम झाला होता. त्यावेळी देशातील वीज कपात 13 तासांपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यावेळी श्रीलंका अन्न आणि इंधनासह अनेक जीवनावश्यक वस्तू आयात करण्यासाठी संघर्ष करत होता.