जपानला जेबी वादळाचा तडाखा, 11 मृत्युमुखी, 300 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 12:16 PM2018-09-05T12:16:32+5:302018-09-05T12:21:05+5:30
टोकियो- गेल्या 25 वर्षातील सर्वात मोठ्या वादळाचा तडाखा जपानला बसला आहे. जेबी असे या वादळाचे नाव असून जपानच्या किनारवर्ती प्रदेशाचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
या वादळामुळे पाऊस, वेगवान वारे आणि भूस्खलन झाल्यामुळे 11 लोकांचे प्राण गेले आहेत तर 300 लोक जखमी झाले आहेत. वादळामळे झाडे उन्मळून पडण्याचे, कार हवेत उचलले जाण्याचे व्हीडिओही प्रसिद्ध झाले आहेत. ओसाका आणि क्योटोमधील 16 लाख घरांची वीज या वादळामुळे गेली आहे. या वादळाने जपानला तडाखा दिला तेव्हा त्याचा वेग प्रतीताशी 216 किमी इतका होता.
1993 नंतर आलेले जपानमधील हे सर्वात विनाशकारी वादळ आहे. जेबी वादळामुळे 10 लाख लोकांना घरे सोडून सुरक्षित जावे लागले आहे तर शेकडो विमानउड्डाणे रद्द करावी लागली आहेत. वादळामुळे आलेल्या पावसाचे पाणी ओसाकातील कान्साइ विमानतळाच्या धावपट्टीवर साचले असून 3 हजार लोक विमानतळावर रात्रभर अडकून पडले. जपानमधील सर्वात जास्त व्यग्र विमानतळ म्हणून या विमानतळाची ओळख आहे. मंगळवारी या विमानतळावरील 750 उड्डाणे रद्द करण्यात आली.
जपानच्या हवामान विभागाने बुधवारी या वादळाचे केद्र जपान समुद्रापासून बाजूला सरकल्याचे स्पष्ट केले. मात्र ते अद्याप सक्रीय असल्याचे सांगितले. उत्तर आणि पूर्व जपानमध्ये बुधवारी 2 इंच इतका पाऊस पडेल असेही या विभागाने सांगितले आहे. पंतप्रधान शिंजो आबे यांनी क्युशू चा दौरा रद्द केला असून लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत असे आव्हान केले आहे.