बाळास होणाऱ्या ‘एचआयव्ही’चे क्युबातून उच्चाटन
By admin | Published: July 2, 2015 02:38 AM2015-07-02T02:38:14+5:302015-07-02T02:38:14+5:30
क्युबा हा आईपासून मुलाला होणारा एचआयव्ही, गुप्तरोगाचा संसर्ग संपुष्टात आणणारा जगातील पहिला देश ठरला आहे.
वॉशिंग्टन : क्युबा हा आईपासून मुलाला होणारा एचआयव्ही, गुप्तरोगाचा संसर्ग संपुष्टात आणणारा जगातील पहिला देश ठरला आहे.
एचआयव्ही व लैंगिक संबंधांतून होणारा संसर्ग याविरुद्धच्या आमच्या प्रदीर्घ लढ्याला मिळालेले हे मोठे यश असून एड्समुक्त पिढीचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक मार्गरेट चान यांनी म्हटले आहे. जागतिक पातळीवर आरोग्याबाबतची वाढलेली जागरूकता, तपासणीच्या सुविधेत सुधारणा आणि गर्भवती मातेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. क्युबात आईपासून मुलाला संसर्ग होण्याची एक लाख मुलांच्या तुलनेत ५० हूनही कमी उदाहरणे आहेत. आईपासून मुलाला होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी अॅन्टीरेट्रोव्हायरल उपचार १०० टक्के परिणामकारक नाहीत. त्यामुळे काहींना अशा प्रकारचा संसर्ग झालेला आहे, असे त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)
संसर्गाचे प्रमाण घटल्यामुळे आता ही सार्वजनिक आरोग्य समस्या राहिलेली नाही, असे डब्ल्यूएचओ आणि पॅन अमेरिकी आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
क्युबातील आरोग्य अधिकारी सुरुवातीपासूनच गर्भवती महिलेची काळजी घेतात. गर्भवती, त्यांच्या जोडीदारांची एचआयव्ही तपासणी केली जाते. ती सकारात्मक आढळल्यास महिला आणि गर्भातील शिशुवर उपचार करण्यात येतात. याशिवाय शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती आणि स्नतपानाच्या पर्यायांची खबरदारी घेण्यात येते. क्युबात २०१० पासून हे उपाय सुरू आहेत.
- एचआयव्हीबाधित १० लाख ४० हजार महिला दरवर्षी गर्भवती होतात व त्यांच्यावर उपचार केले जात नाहीत. या महिलांपासून गर्भधारणा, प्रसूती आणि स्तनपानादरम्यान मुलाला संसर्ग होण्याचा १५ ते ४५ टक्के धोका असतो; मात्र महिला आणि मुलाला अँटीरेट्रोव्हायरल औषध दिले गेल्यास संसर्गाचा धोका केवळ १ टक्क्याहून थोडा अधिक रहातो.
२००९ मध्ये एचआयव्ही संसर्ग झालेले चार लाख मुले जन्माला आली होती. २०१३ मध्ये ही संख्या कमी होऊन २ लाख ४० हजार झाली. २०१५ मध्ये ही संख्या ४० हजारांहून खाली आणण्याचे जागतिक लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.