अमेरिकेत कर्मचारी कपातीवरून बैठकीत भिडले एलन मस्क अन् मार्को रूबियो; ट्रम्प पाहतच राहिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 09:09 IST2025-03-08T09:08:44+5:302025-03-08T09:09:21+5:30
एलन मस्क यांच्या आरोपाला रुबियो यांनीही प्रत्युत्तर दिलं.

अमेरिकेत कर्मचारी कपातीवरून बैठकीत भिडले एलन मस्क अन् मार्को रूबियो; ट्रम्प पाहतच राहिले
वॉशिंग्टन - अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचे मित्र प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सरकारी तिजोरीतून होणाऱ्या खर्चाचा आढावा घेऊन जास्तीत जास्त बचत आणि महसूल जमा करण्याचं काम मस्क यांच्यावर दिले आहे. त्यातूनच एलन मस्क यांच्या निर्णयानं अनेक कर्मचारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत. त्यातूनच ट्रम्प प्रशासनातच फूट पडल्याचं चित्र दिसून येते. गुरुवारी एका कॅबिनेट बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो आणि व्हाइटहाऊसचे सल्लागार एलन मस्क यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी डोनाल्ड ट्रम्पही हजर होते.
न्यूयॉर्क टाइम्स रिपोर्टनुसार, हा वाद शासकीय विभागातून कर्मचाऱ्यांची कपात करण्यावरून झाला आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांनी मस्क यांना खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यावरून मस्क यांनी अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. बैठकीत मस्क यांनी रूबियो यांच्यावर आरोप करत त्यांनी अद्याप कुणालाही हटवले नाही. विभागातील कर्मचारी कपात याचा ते विरोध करतायेत असं म्हटलं. मस्क यांच्या आरोपाला रुबियो यांनीही प्रत्युत्तर दिलं.
१५०० विभागीय कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. मी त्या सर्वांना पुन्हा कामावर ठेवावं असं मस्क यांना वाटतं का, जेणेकरून त्यांना पुन्हा दिखाऊपणा करून कामावरून काढावे असं रूबियो यांनी मस्क यांना खोचक शब्दात विचारले. सरकारी संस्थांच्या प्रमुखांनी मस्क यांच्या कपात अभियानावर नाराजी व्यक्त केली होती त्यापार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली होती. व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ लेजिस्लेटिव अफेयर्सला अलीकडच्या काळात अनेक नाराज रिपब्लिकन खासदारांच्या तक्रारी मिळाल्या. ज्यात त्यांना मतदारसंघातील मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय असं म्हटलं होते.
मंत्रिमंडळात वादाची बातमी फेटाळली
शुक्रवारी ओवल ऑफिसमधील एका पत्रकार परिषदेत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाइम्सची ही बातमी फेटाळली. जेव्हा एका पत्रकाराने त्यांना वादावर विचारले, तेव्हा बैठकीत कुठलाही वाद झाला नाही, मी तिथे होतो. तुम्ही विनाकारण याचा मुद्दा बनवत आहे. एलन आणि रूबियो यांच्यात सर्व काही ठीक आहे. दोघेही उत्तम काम करत आहेत. परराष्ट्र मंत्री म्हणून मार्को रूबियो उत्तम काम करत आहेत. एलनही त्यांची जबाबदारी चोख सांभाळत आहेत असं कौतुक ट्रम्प यांनी केले.