एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 09:51 AM2024-11-13T09:51:53+5:302024-11-13T09:57:27+5:30
Elon Musk and Vivek Ramaswamy: सरकारमधील काही मोठ्या पदांवरील नियुक्त्या केल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योजक एलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.
नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पराभूत केले. आता २० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. मात्र तत्पूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या पुढील सरकारमधील सहकाऱ्यांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. सरकारमधील काही मोठ्या पदांवरील नियुक्त्या केल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योजक एलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.
एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी हे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशियन्सी (DoGE) विभागाचं नेतृत्व करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, मला हे सांगताना आनंद होत आहे की, ग्रेट एलॉन मस्क आणि अमेरिकन देशभक्त विवेक रामास्वामी हे एकत्र मिळून डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशियन्सीचं नेतृत्व करतील. सेव्ह अमेरिका मुव्हमेंटसाठी हे आवश्यक आहे. हे दोघेही मिळून माझ्या सरकारमधील नोकरशाहीला स्वच्छ करण्यापासून वायफळ खर्चामध्ये कपात करण्यासह, अनावश्यक नियमांना संपुष्टात आणून केंद्रीय यंत्रणांच्या पुनर्रचनेसाठी काम करतील. ही बाब आमच्या काळातील मॅनहॅटन प्रकल्प ठरू शकतो. रिपब्लिकन नेत्यांनी दीर्घकाळापासून DOGE चे उद्देश पूर्ण करण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे.
अमेरिकन सरकारच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, यामुळे सरकारी निधी वाया घालवणाऱ्याा लोकांना थेट संदेश मिळणार आहे. तर विवेक रामास्वामी यांनी सांगितले की, एलॉन मस्क गांभीर्याने काम करतील. दरम्यान, विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून दावेदारी केली होती. मात्र नंतर त्यांनी आपली दावेदारी मागे घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पाठिंबा दिला होता.