माझ्या मंजुरीशिवाय मस्क काहीही करू शकत नाहीत; डोनाल्ड ट्रम्प यांचे असे वक्तव्य का आले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:16 IST2025-02-04T11:15:29+5:302025-02-04T11:16:16+5:30
काही दिवसांपूर्वीच अमेरिका इतर देशांना देत असलेली मदत रोखण्यात आली होती. ती मस्क यांनी रोखल्याची वृत्ते येत होती.

माझ्या मंजुरीशिवाय मस्क काहीही करू शकत नाहीत; डोनाल्ड ट्रम्प यांचे असे वक्तव्य का आले?
अमेरिकेच्या आर्थिक धोरणांची समिक्षा करणारी कमिटी डॉज ही अब्जाधीश एलन मस्क यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. मस्क यांनी अमेरिकेच्या आर्थिक गोष्टी ताब्यात घेतल्यावरून विरोधक टीका करत होते. काही दिवसांपूर्वीच अमेरिका इतर देशांना देत असलेली मदत रोखण्यात आली होती. ती मस्क यांनी रोखल्याची वृत्ते येत होती. यावर आता ट्रम्प यांनी खुलासा केला आहे.
काहीही झाले तरी एलन मस्क माझ्या मंजुरीशिवाय स्वत:हून कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. तसेच घेणारही नाहीत. जिथे मला योग्य वाटेल तिथे मी त्यांना मंजुरी देईन, परंतू जिथे योग्य वाटणार नाही तिथे त्यांच्या प्रस्तावाला नकार दिला जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
मस्क यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) ला अमेरिकन सरकारच्या संवेदनशील आर्थिक डेटाचा अॅक्सेस मिळाला असल्याचा आरोप करण्यात येत होता. मस्क यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच अमेरिकेच्या वित्त विभागातील एक उच्च अधिकारी डेव्हिड लेब्रिक यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे विरोधी पक्ष डेमोक्रॅटच्या नेत्यांनी यावरून चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.
मस्क आणि त्यांचा विभाग बेकायदेशीरपणे संघीय देयके रोखू शकतात, यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होऊ शकते, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. मस्कवर युरोपीय राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोपही केला जात आहे. यावर आता व्हाईट हाऊसने निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये मस्क हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सरकारी कर्मचारी म्हणून काम करत आहेत, परंतु ते पूर्णवेळ संघीय कर्मचारी नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.