बनावट खाते मुद्दा मिटल्याशिवाय ट्विटर सौदा नाही; इलॉन मस्क यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 06:07 AM2022-05-18T06:07:33+5:302022-05-18T06:08:17+5:30

या सौद्याच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत.

elon musk clears that twitter is not a deal without a fake account issue | बनावट खाते मुद्दा मिटल्याशिवाय ट्विटर सौदा नाही; इलॉन मस्क यांनी केले स्पष्ट

बनावट खाते मुद्दा मिटल्याशिवाय ट्विटर सौदा नाही; इलॉन मस्क यांनी केले स्पष्ट

Next

लंडन :ट्विटरवरील बनावट खाती ५ टक्क्यांपेक्षा कमी आहेत, याचा सार्वजनिक पुरावा कंपनीने दाखविल्याशिवाय ट्विटर खरेदी सौदा पुढे जाणार नाही, असा स्पष्ट इशारा या कंपनीचे खरेदीदार तथा टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी दिला आहे. त्यामुळे या सौद्याच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत.

मस्क यांनी एका वापरकर्त्याच्या प्रतिसादास उत्तर देताना ट्विटरवरच हे वक्तव्य केले आहे. ट्विटरवरील बनावट खाती ५ टक्क्यांपेक्षा कमी आहेत, असे ट्विटरने आपल्या नियामकीय दस्तावेजात म्हटले होते. तथापि, कंपनीच्या या म्हणण्यास कोणताही अधिकृत पुरावा नाही. त्यामुळे हा मुद्दा सौद्यात मुख्य अडसर ठरला आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी एक दिवस आधी बनावट खाती रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली, तसेच बनावट खाती ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा दावा वारंवार केला.

मस्क यांनी मंगळवारी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘ट्विटरवरील २० टक्के बनावट खाती ही कंपनीच्या मूळ दाव्यापेक्षा तब्बल ४ पट अधिक आहेत. मी ट्विटर खरेदीसाठी दिलेला प्रस्ताव ट्विटरच्या नियामकीय दाव्यावर आधारित होता; पण या ट्विटरच्या सीईओंनी काल या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कोणताही पुरावा देण्यास नकार दिला. ते जोपर्यंत पुरावा देत नाहीत, तोपर्यंत हा सौदा पुढे सरकू शकत नाही.’ मस्क यांच्या या वक्तव्यावर ट्विटरने कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही. तत्पूर्वी, सोमवारी मियामी तंत्रज्ञान परिषदेत मस्क यांनी म्हटले होते की, ‘ट्विटरवर २० टक्के म्हणजेच २२९ दशलक्ष खाती बनावट आहेत, असा अंदाज आहे.’

व्यवहार नेमका कुठे अडकला?

मस्क यांनी गेल्या आठवड्यात बनावट खात्यांचा मुद्दा समोर आणला होता. कंपनीच्या दाव्याप्रमाणे बनावट खाती ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत ट्विटर खरेदी सौदा स्थगित करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

इलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलरला ट्विटर विकत घेतले आहे. तथापि, बनावट खात्यामुळे ते आता ही किंमत देण्यास तयार नसल्याचे संकेत त्यांच्याकडून दिले जात आहेत. कमी किमतीतील व्यवहार्य सौद्याचा मुद्दा नाकारला जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.

Web Title: elon musk clears that twitter is not a deal without a fake account issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.