डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 10:15 PM2024-10-07T22:15:50+5:302024-10-07T22:16:13+5:30
US Election: इलॉन मस्क आतापर्यंत सोशल मीडियाद्वारे समर्थन द्यायचे, पण आता ते प्रचारसभेत सामील झाले.
Elon Musk in US Election: स्पेसएक्स आणि टेस्लासारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देत आहेत. आतापर्यंत ते सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या समर्थनार्थ पोस्ट करायचे, पण आता ते थेट प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. शनिवारी पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्या रॅलीत ते सहभागी झाले. जुलैमध्ये ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, त्याच ठिकाणी ही रॅली काढण्यात आली.
या रॅलीत इलॉन मस्क पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे अतिशय उत्साहात दिसले. एवढा मोठा उद्योगपती उघडपणे एका पक्षाच्या प्रचारात उतरण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. यावेळी मस्क म्हणाले की, ही फक्त निवडणूक नसून, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. अमेरिकेत लोकशाही आणि संविधान वाचवायचे असेल, तर ट्रम्प जिंकणे आवश्यक आहे. या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय किती महत्त्वाचा आहे, यावर ते सातत्याने भर देत होते.
I don’t know if this will make sense to anyone but Elon jumps like a homeschool kid pic.twitter.com/9b9eMyCsKy
— Ben Palmer (@benjpalmer) October 6, 2024
ट्रम्प यांना पाठिंबा देण्यामागचे कारण काय?
इलॉन मस्क यांची ही विधाने आणि सोशल मीडियावरील पोस्ट सतत प्रश्न उपस्थित करतात की, ते निवडणुकीत ट्रम्प यांना पाठिंबा देण्याचे कारण काय? यामागे फक्त पैसा हेच कारण आहे की आणखी काही कारण आहे? मूळात, इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयामागे अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, त्यांनी रिपब्लिकन पक्षाला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मस्क रिपब्लिकन पक्षाशी संबंधित संस्थांना लाखो-कोटी रुपयांची देणगी देतात. एका अहवालानुसार, 2022 च्या सुरुवातीला मस्क यांनी ट्रम्पचे सल्लागार स्टीफन मिलर यांच्याशी संबंधित एका संस्थेला 60 मिलियन डॉलर्सचा निधी दिला होता.
यानंतर, 2022 च्या अखेरीस सिटिझन्स फॉर सॅनिटी नावाच्या संस्थेला 50 मिलियन डॉलर्सची देणगी दिली, जी अमेरिकेच्या स्विंग राज्यांमध्ये ट्रान्सजेंडर-मुले आणि बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यावर डेमोक्रॅटिक पक्षाच्या विरोधात काम करते. साहजिकच ट्रम्प जिंकले तर इलॉन मस्क यांना अमेरिकेत पाठिंबा आणि सहकार्य करणारे सरकार मिळेल.
बायडेन-हॅरिस प्रशासनाचा त्रास वाढला
बायडेन आणि हॅरिस प्रशासनाने त्यांच्या कार्यकाळात टेक कंपन्यांवर बरेच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. द न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, बायडेन-हॅरिस प्रशासनाने सार्वजनिक हितासाठी काम करण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांवर सर्वाधिक दबाव टाकला आहे. बाडेनच्या नॅशनल इकॉनॉमी कौन्सिलचे माजी संचालक ब्रायन डीझ म्हणतात की, मोठ्या कंपन्या मूळतः वाईट नसतात, परंतु बाजारपेठेतील त्यांची मक्तेदारी असल्यामुळे ते असामान्य मार्गांनी वस्तूंच्या किमती वाढवू लागतात. यामुळे ग्राहकांना फारसा पर्याय मिळत नाही आणि निरोगी स्पर्धेमुळे येणारे नावीन्य देखील कमी होते.
गेल्या तीन वर्षांत यूएस फेडरल ट्रेड कमिशन आणि न्याय विभागाने फेसबुक, गुगल, ऍमेझॉन आणि अॅपल यांसारख्या कंपन्यांवर कारवाई केली आहे आणि त्यांच्यावर निरोगी स्पर्धा दडपल्याचा आणि ग्राहकांचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कमला हॅरिसच्या विजयाने या टेक कंपन्यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. हॅरिस प्रशासनात त्यांची मनमानी कमी आणि सरकारी हस्तक्षेप जास्त असेल. न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, या मोठ्या टेक कंपन्यांच्या मालकांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आपले म्हणणे मांडणे कमला हॅरिसच्या तुलनेत सोपे असेल.
ट्रम्प सरकारमध्ये मस्क यांना मोठे पद मिळणार
याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान हे स्पष्ट केले आहे की, ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले तर इलॉन मस्क यांना त्यांच्या सरकारमध्ये मंत्री किंवा महत्त्वाच्या सल्लागाराची भूमिका देणार आहेत. ट्रम्प सरकारची धोरणे ठरवण्यात मस्क महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ट्रम्प यांची ऑफर स्वीकारताना इलॉन मस्क यांनीही X वर लिहिले की, ते या पदावर काम करण्यास तयार आहेत. सरकारच्या धोरणनिर्मिती प्रक्रियेत त्यांचा सहभाग असेल, तर साहजिकच अमेरिकेसह जगभर आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवणे त्यांना सोपे जाईल.