अमेरिकेचा डोकेबाजपणा! मेंदूत चीप बसवून माणसांवर राखणार नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 08:22 AM2022-12-04T08:22:20+5:302022-12-04T08:22:34+5:30
निसर्ग नियमाविरुद्ध कृती असल्याची टीका, रिपेअर या प्रकल्पाचे काम व्हर्जिनियातील एका इमारतीमध्ये सुरू असून, त्यामध्ये २२० संशोधक कार्यरत आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकी सरकार आपल्या सैनिकांच्या मेंदूत इलेक्ट्रॉनिक चीप बसवून त्यांच्यावर नियंत्रण राखण्याची व त्यांचे शारीरिक सामर्थ्य वाढविण्यासाठी संशोधन करत आहे.
इलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक ब्रेन ही कंपनी माणसाच्या मेंदूत इलेक्ट्रॉनिक चीप बसविण्यासाठी येत्या सहा महिन्यांत प्रयोग सुरू करण्याची शक्यता आहे. मात्र, असे प्रयोग निसर्ग नियमाच्या विरोधात असल्याची टीका होत असल्याने ते संशोधन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. माणसाच्या मेंदूत इलेक्ट्रॉनिक चीप बसवली तर त्याच्या अनेक आजारांना रोखता येईल, असे सांगण्यात येत आहे.
या कारणांसाठी संशोधन
अमेरिकेचे हजारो सैनिक अफगाणिस्तान व इराकमध्ये युद्ध केल्यानंतर काही वर्षांनी मायदेशी परतले. नैराश्यामुळे त्यातील कित्येकांनी आत्महत्या केली आहे. युद्धग्रस्त वातावरणात व शांततेच्या काळात मेंदू वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतो. चीपद्वारे त्यांच्या भावनांवर नियंत्रण मिळविता येईल का, यादृष्टीने संशोधन सुरू आहे.
२२०हून अधिक संशोधक कार्यरत
रिपेअर या प्रकल्पाचे काम व्हर्जिनियातील एका इमारतीमध्ये सुरू असून, त्यामध्ये २२० संशोधक कार्यरत आहेत. अतिशय गोपनीय पद्धतीने चाललेल्या या संशोधनात आणखी २ हजार कर्मचारी सक्रिय आहेत. विविध विद्यापीठातील नामवंत संशोधक या प्रकल्पात मोठे योगदान देत आहेत.
सैनिकांचे सामर्थ्यही वाढणार
अमेरिकी सैनिकांच्या मेंदूत चीप बसविल्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण नियंत्रण राखता येणार आहे, त्यांचे शारीरिक सामर्थ्यदेखील वाढविण्याचा प्रयत्न अमेरिकेचे संशोधक करणार आहेत, असा दावा २०१५ साली दी पेटॅगॉन ब्रेन या पुस्तकात केला होता.
‘रिपेअर’ असे संशोधन प्रकल्पाचे नाव
अमेरिकेच्या डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने (डीएआरपीए) देखील मेंदूत चीप बसविण्यासंदर्भात काही संशोधन सुरू केले आहे. त्या प्रकल्पाला रिपेअर असे नाव दिले आले आहे.