ट्विटरचं अकाउंट डिलीट कसे करायचे?; गुगलवर सर्च करणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ५०० टक्क्यांनी वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 06:49 AM2022-11-05T06:49:22+5:302022-11-05T06:49:31+5:30
कंपनीच्या पायाभूत सुविधांचा खर्च कमी करून, मस्क यांना १ अब्ज डॉलर म्हणजे ८२ अब्ज वाचवायचे आहेत.
वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ट्विटरमधील कर्मचाऱ्यांना कमी करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. कंपनीच्या पायाभूत सुविधांचा खर्च कमी करून, मस्क यांना १ अब्ज डॉलर म्हणजे ८२ अब्ज वाचवायचे आहेत.
जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून ट्विटरने भारतातील कंपनीच्या २०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. गुरुवारी कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठविण्यात आला. कर्मचारी कंपनीत येत असतील तर त्यांनी थेट घरी जावे, असे त्यात म्हटले आहे. ट्विटरमध्ये सध्या ७ हजार ५०० कर्मचारी असून, ३ हजार ७०० जणांना नारळ देण्याची मस्कची तयारी आहे.
कर्मचारी कोर्टात
ट्विटरमधील कर्मचारी कामावरून काढण्याच्या मुद्द्यावर सॅन फ्रान्सिस्को फेडरल कोर्टात गेले असून, तेथे खटला दाखल करण्यात आला आहे. कंपनी कोणतीही सूचना न देता कामावरून काढत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. असे करणे फेडरल आणि कॅलिफोर्निया कायद्याचे उल्लंघन आहे. कायद्यानुसार, किमान ६० दिवसांच्या पूर्वसूचनेशिवाय कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले जाऊ शकत नाही.
डिलीट कसे करायचे, ५०० % सर्च वाढली
ट्विटरच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. ब्लू टीकसाठी शुल्काच्या निर्णयानंतर वापरकर्त्यांमध्ये नाराजी आहे. अकाउंट डिलीट कसे करायचे हे सर्च करणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हे गुगलवर सर्च करणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ५०० टक्क्यांनी वाढले आहे.