मोठ्या बदलाचे संकेत? Elon Musk यांच्या ट्विटर पोलला तब्बल १६ लाख मते; जगभरात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 11:13 AM2022-04-06T11:13:44+5:302022-04-06T11:15:20+5:30
इलॉन मस्क यांच्या पोलनंतर आता ट्विटरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वॉशिंग्टन: टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असतात. अलीकडेच इलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये तब्बल २.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. यानंतर आता इलॉन मस्क ट्विटरमध्ये काही बदल करण्यासाठी सरसावले असल्याचे सांगितले जात आहे. याचे कारण म्हणजे इलॉन मस्क यांनी ट्विटरवर एक पोल घेतला आणि या पोलला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. इलॉन मस्क यांच्या या पोलची जगभरात चर्चा असल्याचे बोलले जात आहे.
इलॉन मस्क आता ट्विटर कंपनीतील ९.२ टक्के हिश्शासहीत सर्वात मोठे समभागधारक झाले आहेत. इतकेच नाही, तर इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरचा सहसंस्थापक असणाऱ्या जॅक डॉर्सींपेक्षा चारपट समभाग आहेत. मस्क यांच्या या निर्णयानंतर ट्विटरच्या समभागांमध्ये २६ टक्क्यांची वृद्धी पाहायला मिळाली. इलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये एवढी मोठी गुंतवणूक करण्याआधीही एक पोल घेतला होता.
तुम्हाला एडिट बटण हवंय का?
इलॉन मस्क यांच्या ताज्या पोलमध्ये, “तुम्हाला एडिट बटण हवंय का?”, असा प्रश्न विचारण्यात आला होता. होय किंवा नाही असे दोन पर्याय देण्यात आले होते. ट्विटरवरील या पोलवर अवघ्या काही तासांत १६ लाख ७० हजारांहून अधिक मते नोंदवण्यात आली. हे ट्विट ३२ हजार ६०० हून अधिक वेळा रिट्विट करण्यात आले असून त्याला एक लाख १० हजारांहून अधिक लाइक्स आहेत. ट्विटरमधील गुंतवणुकीपूर्वी घेतलेला पोल, त्यानंतरच्या घडामोडी आणि आता ट्विटरवर एडिट बटणसंदर्भात घेण्यात आलेला नवा पोल यावरुन लवकरच ट्विटरमध्ये काहीतरी मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दुसरीकडे इलॉन मस्क केवळ चाचपणीसाठी पोल घेत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. यावर ३१ हजार कमेंट्स आल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ट्विटरमधील गुंतवणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या पोलमध्ये, आपल्या ८ कोटी फॉलोवर्सला ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कठोरपणे पालन करते की नाही? असा प्रश्न विचारला होता. तसेच सर्वांना काळजीने मतदान करावे कारण या मतदानाचे परिणाम महत्त्वाचे असणार आहे, असे नमूद केले होते. या मतदानामध्ये ७० टक्के लोकांनी ‘नाही’ च्या बाजूने मतदान केले होते. यानंतर इलॉन मस्क यांनी ट्विटरला इतर कोणता पर्याय आहे का, असे विचारले होते. त्यानंतर लगेचच त्यांनी ट्विटरमध्ये मोठी गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली.