“गुगल आणि फेसबुकमुळे तरुणांमधील प्रतिभा मरतेय”; एलन मस्क यांचा थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 01:00 PM2021-10-21T13:00:57+5:302021-10-21T13:02:01+5:30
टेस्ला (Tesla) आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलन मस्क (Elon Musk) यांनी गुगल (Google) आणि फेसबुकसारख्या (Facebook) बड्या टेक कंपन्यांवर जोरदार टीका केली आहे.
न्यूयॉर्क: टेस्ला (Tesla) आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलन मस्क (Elon Musk) यांनी गुगल (Google) आणि फेसबुकसारख्या (Facebook) बड्या टेक कंपन्यांवर जोरदार टीका केली आहे. एलन मस्क यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. एका ट्विटला रिप्लाय करताना त्यांनी या टेक कंपन्यांवर निशाणा साधला.
जेडी रॉस नावाच्या ट्विटर युझर्सने गुगलवर निशाणा साधत म्हटले होते की, गुगलची सर्वांत मोठी वाईट गोष्ट म्हणजे ते २२ वर्षांच्या हुशार तरुणांना मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणारे महत्त्वाकांक्षी संस्थापक बनवण्याऐवजी करिअरिस्ट बनवतात, या शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. यावर एलन मस्क यांनी रिप्लाय देत टेक कंपन्यांवर निशाणा साधला.
गुगल आणि फेसबुकमुळे तरुणांमधील प्रतिभा मरतेय
ट्विटला उत्तर देताना, मोठ्या टेक कंपन्या अशा ठिकाणांमध्ये बदलल्या आहेत जिथे तरुणांची प्रतिभा मरते, या शब्दांत एलन मस्क यांनी थेट या कंपन्यांवर टीका केली. टेस्ला या कंपन्यांपेक्षा अशा कोणत्या वेगळ्या गोष्टी करत आहे, आणि तरुणांमधील प्रतिभा मरत नाही याची खात्री कशी करत आहे, असा प्रश्न एलन मस्क यांना या प्रतिक्रियेनंतर विचारण्यात आला होता. यापैकी काही युजर्सनी गुगलची बाजू घेतली. करियर करण्यासाठी आणि लवकर पैसे कमवण्यासाठी, आयुष्यात पुढे जाण्यासाठी गुगल हे एक उत्तम ठिकाण आहे, असे एका युझरने म्हटले आहे.
दरम्यान, एलन मस्क यांनी गुगल, अमेझॉनसह अन्य बड्या टेक कंपन्यांवर यापूर्वीही मोठी टीका केली आहे. याआधी अनेक वेळा त्यांनी गुगल, फेसबुक आणि अमेझॉनवर निशाणा साधला आहे. अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्याविरोधात त्यांचे मत व्यक्त केले होते. तर अॅमेझॉनला एकदा कोरोना व्हायरस विषयीच्या पुस्तकाच्या प्रकाशनावर सेन्सॉर केल्याबद्दल एलन मस्क यांनी लक्ष्य केले होते.