‘टाइम’च्या कव्हरवर दिसले राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले एलॉन मस्क, ट्रम्प म्हणाले, ते मासिक अजून सुरू आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 15:36 IST2025-02-09T15:27:07+5:302025-02-09T15:36:19+5:30
Time Magazine News: आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठिक असलेल्या टाइम मासिकाच्या मुखपृष्टावर फोटो झळकणं हा मोठ्या सन्मानाचा विषय मानला जातो. मात्र टाइम मासिकाच्या नव्या अंकाच्या मुखपृष्टावर उपरोधिकपणे वापरण्यात आलेला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

‘टाइम’च्या कव्हरवर दिसले राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले एलॉन मस्क, ट्रम्प म्हणाले, ते मासिक अजून सुरू आहे?
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठिक असलेल्या टाइम मासिकाच्या मुखपृष्टावर फोटो झळकणं हा मोठ्या सन्मानाचा विषय मानला जातो. मात्र टाइम मासिकाच्या नव्या अंकाच्या मुखपृष्टावर उपरोधिकपणे वापरण्यात आलेला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये एलॉन मस्क यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले दाखवण्यात आले आहे. त्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली असून, टाइम मासिक अजूनही सुरू आहे का? असा तिरकस प्रश्न विचारला आहे.
टाइम मासिकाच्या कव्हर फोटोमध्ये एलॉन मस्क हे हातात कॉफीचा कप घेऊन राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहे. त्यांच्या पाठीमागे अमेरिकेचा आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा फोटो दिसत आहे. टाइमने शुक्रवारी एक कव्हर स्टोरीही प्रसिद्ध केली होती. इनसाइड एलॉन मस्क वॉर ऑन वॉशिंग्टन, असा त्याचा मथळा होता. या लेखामध्ये २० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून सरकारमध्ये एलॉन मस्क यांनी उचललेल्या पावलांचा उल्लेख करण्यात आला होता.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना टाइम मासिकाच्या मुखपृष्टावर छापण्यात आलेल्या एलॉन मस्क यांच्या फोटोबाबत विचारले असता त्यांनी विचारले की, टाइम मासिक अजूनही सुरू आहे? मला हे माहितच नव्हतं, अशी खोचक टिप्पणी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. एलॉन मस्क मागच्या काही काळात दुसऱ्यांदा टाइम मासिकाच्या मुखपृष्टावर झळकले आहेत. याआधी नोव्हेंबर महिन्यात ते सिटिझन मस्क या रूपामध्ये दिसले होते.