Elon Musk: एलोन मस्कसाठी 2022 ची जबरदस्त सुरुवात, पहिल्याच दिवशी संपत्तीत झाली मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 01:16 PM2022-01-04T13:16:07+5:302022-01-04T13:16:17+5:30
Elon Musk:एलॉन मस्क यांनी सोमवारी प्रति तास 1.41 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि SpaceX आणि Tesla सारख्या दिग्गज कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांच्यासाठी नवीन वर्षाची धमाकेदार सुरूवात झाली. 2022 च्या पहिल्याच दिवशी एलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलॉन मस्क यांच्या संपत्तीत वाढ होऊन एकूण संपत्ती 304 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. सोमवारी मस्क यांनी प्रति तास 1.41 अब्ज डॉलर्सची कमाई केली.
2.5 लाख कोटींची वाढ
जगातील श्रीमंत लोकांपैकी एस असलेल्या एलोन मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने त्यांची संपत्ती वाढली आहे. यामुळे, मस्कची एकूण संपत्ती एका दिवसात $33.8 अब्ज किंवा सुमारे 2,51,715 कोटी रुपयांनी वाढली. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या वाढीसह एलोन मस्कची एकूण संपत्ती 304 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे.
टेस्लाचे शेअर्स झपाट्याने वाढले
खरं तर, एलोन मस्कच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर्स वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी 14 टक्क्यांनी वाढले. चौथ्या तिमाहीतील विक्रमी वितरणामुळे सोमवारी कंपनीचा समभाग 13.5 टक्क्यांनी वाढून $1,199.78 वर पोहोचला. टेस्लाची जवळपास 10 महिन्यांच्या कालावधीतील एका दिवसातील सर्वात मोठी उडी आहे.
या वर्षी आणखी चांगली कामगिरीची अपेक्षा
तज्ञांच्या मते टेस्लाची कामगिरी वर्षभर मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. बर्लिन आणि टेक्सासमध्ये नवीन कारखान्यांच्या बांधकामामुळे कंपनीचे उत्पादन वाढेल आणि वितरणास गती मिळेल. टेस्लाला सुट्या भागांच्या तुटवड्याचाही सामना करावा लागत आहे, परंतु त्यांनी नवीन पद्धतींचा अवलंब करुन त्याचे व्यवस्थापन केले आहे, ज्याचा परिणाम दिसून येत आहे.