Twitter: ‘इलॉन मस्क ट्विटरचा हत्यारा’, हुकूमशाही वृत्तीमुळे संतापले कर्मचारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 05:51 AM2022-11-19T05:51:55+5:302022-11-19T05:52:18+5:30
Elon Musk: मस्कच्या हुकूमशाही वृत्तीचा परिणाम म्हणून ट्विटरवर #RIPTwitter हा हॅशटॅगदेखील टॉप ट्रेंडिंगमध्ये आला. या राजीनाम्यांनंतर ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांच्या ‘१२ तास काम करा किंवा नोकरी सोडा,’ या आदेशानंतर गेल्या दोन दिवसांत शेकडो कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. नेमक्या किती कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला, हे समजू शकलेले नाही; पण या गोंधळात कंपनीने आपली काही कार्यालये २१ नोव्हेंबरपर्यंत तात्पुरती बंद ठेवल्याचेही शुक्रवारी समोर आले.
मस्कच्या हुकूमशाही वृत्तीचा परिणाम म्हणून ट्विटरवर #RIPTwitter हा हॅशटॅगदेखील टॉप ट्रेंडिंगमध्ये आला. या राजीनाम्यांनंतर ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ऑफिसच्या इलेक्ट्रॉनिक बिल बोर्डवर हुकूमशहा, परजिवी, वेडा आणि अहंकारी असे लिहिले होते. मस्कने बोलावलेली मीटिंग सुरू असतानाच काही कर्मचारी बैठक सोडून गेल्याचेही समोर आले. मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे आणि १२ तास काम करण्यावर जोरदार टीका होत आहे. काही कर्मचाऱ्यांनी आपले राजीनामे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘इलॉन मस्क ट्विटरचा हत्यारा’ आहे, अशा कमेंट अनेकजण राजीनाम्यांनंतर करत आहेत. त्यावर, ‘राजीनाम्यांबद्दल मला चिंता नाही; सर्वश्रेष्ठ लोक अजूनही ट्विटरमध्ये कायम आहेत,’ अशी प्रतिक्रिया मस्कने दिल्याने संतापात भर पडली. एकूणच, मस्क यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांसह नेटकऱ्यांमध्येही संतापाची लाट दिसतेय...!