“४० तास ऑफिसमध्ये काम करा, अन्यथा नोकरी सोडा”; इलॉन मस्कची टेस्ला कर्मचाऱ्यांना ताकीद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 02:01 PM2022-06-02T14:01:03+5:302022-06-02T14:02:01+5:30
इलॉन मस्क यांनी टेस्ला कर्मचाऱ्यांना ई-मेल केले असून, त्यातून थेट इशारा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली: जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती तसेच टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक इलॉन मस्क सध्या अनेकविध विषयांमुळे चर्चेत आहेत. यातच आता टेस्लाच्या कर्मचाऱ्यांना इलॉन मस्क यांनी सक्त ताकीद दिल्याचे समोर आले आहे. इलॉन मस्क यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. टेस्लाच्या कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येऊन ४० तास काम करावे, अन्यथा कंपनी सोडावी, अशी ताकीद इलॉन मस्क यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसत आहे. यातच अनेकविध क्षेत्रातील बड्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम ऑफिस सुरू केले आहे. काही कंपन्यांनी हायब्रीड योजना राबवली आहे. मात्र, यातच आता मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवला आहे. यात त्यांनी कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या तासाबद्दल सूचना केल्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना थेट इशाराही इलॉन मस्क यांनी दिला आहे.
गोपनीय ई-मेल लीक झाला
टेस्ला कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या इलॉन मस्क यांचा ई-मेल गोपनीय असल्याचे सांगितले जात होते. मात्र, हा ई-मेल आता लीक झाला आहे. इलॉन मस्क यांनी आपल्या ई-मेल मध्ये म्हटले की, रिमोट वर्क करणे आता योग्य नाही. जर कुणाला रिमोट वर्क करायचे असेल तर त्याला ऑफिसला यावे लागणार आहे. तसेच कार्यालयात कमीत कमी एका आठवड्यात ४० तास काम करावे लागणार आहे. जर कोणी कर्मचारी ४० तास काम करण्यास तयार नसेल, तर त्या व्यक्तीने टेस्ला कंपनीला सोडून द्यावी, असा इशारा इलॉन मस्क यांनी ई-मेलमधून कर्मचाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, इलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दोन ई-मेल पाठवले असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या ई-मेलमध्ये सूचनांसह काही अटी देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत काही कर्मचाऱ्यांना रिमोट वर्क करण्याची परवानगी दिली जाणार आहे. दुसऱ्या ई-मेलमध्ये मस्क यांनी लिहिले की, कर्मचाऱ्यांना टेस्लाला ऑफिसमध्ये यावे लागणार आहे. सोबत वरिष्ठ कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांच्या तुलनेत ऑफिसमध्ये जास्त यावे लागणार आहे, असेही इलॉन मस्क यांनी स्पष्ट केले आहे.