मस्तच! एकाचवेळी १४३ उपग्रहांचे प्रक्षेपण; Elon Musk यांच्या कंपनीकडून नवा विक्रम
By देवेश फडके | Published: January 25, 2021 06:23 PM2021-01-25T18:23:56+5:302021-01-25T18:26:27+5:30
Elon Musk यांच्या एका वेगळ्या कंपनीने एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम आधी भारताच्या नावावर होता.
फ्लोरिडा : जागतिक स्तरावर आरामदायी वाहन निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या 'टेस्ला' या कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या Elon Musk यांच्या एका वेगळ्या कंपनीने एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम आधी भारताच्या नावावर होता.
Elon Musk यांच्या 'स्पेसएक्स' या कंपनीकडून अंतराळात एकाच वेळी १४३ उपग्रह यशस्वीरित्या सोडण्यात आले आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये भारताने एकाचवेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम केला होता. भारताच्या या विक्रमाला मागे टाकत स्पेसएक्स यांनी तब्बल १४३ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत. यामुळे स्पेस एक्सने नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
Falcon 9 launches 143 spacecraft to orbit — the most ever deployed on a single mission — completing SpaceX’s first dedicated SmallSat Rideshare Program mission pic.twitter.com/CJSUvKWeb4
— SpaceX (@SpaceX) January 25, 2021
सर्व १४३ उपग्रह 'फाल्कन ९'मधून प्रक्षेपित करण्यात आले. फ्लोरिडा येथील कॅप केनेवरल येथून भारतीय वेळेनुसार, रविवारी रात्री ०८ वाजून ३१ मिनिटांनी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात हे उपग्रह सोडण्यात येणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला. Elon Musk यांची कंपनी उपग्रह सोडण्यासाठी तब्बल १० लाख डॉलर घेते, अशी माहिती मिळाली आहे.
अंतराळात उपग्रह सोडण्याचे स्वप्न घेऊन Elon Musk वयाच्या ३० व्या वर्षी रशियात पोहोचले. मात्र, दोनवेळा प्रयत्न करूनही रशियाने उपग्रह देण्यास नकार दिला. यानंतर Elon Musk यांनी स्वतःच उपग्रह निर्मितीचा चंग बांधला आणि स्पेसएक्स या कंपनीची स्थापना केली. या प्रवासात Elon Musk यांनी अनेक आव्हाने, संकटे आणि अडचणींचा सामना केला. मात्र, अखेर Elon Musk यांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले, असे सांगितले जाते. आताच्या घडीला Elon Musk जागतिक स्तरावरील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये आघाडीवर आहेत.
दरम्यान, Elon Musk यांच्या आरामदायी वाहन निर्मितीत अग्रेसर असलेल्या टेस्ला कंपनीने भारतात आपले पहिले पाऊल ठेवले आहे. बेंगळुरू येथे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी केल्याचे समजते. भारतात टेस्लाकडून इलेक्ट्रिक कार सादर केल्या जाणार आहेत.