मालदीवमध्ये आणीबाणी, कायदा, सुव्यवस्था बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 11:40 PM2018-02-05T23:40:27+5:302018-02-06T00:02:20+5:30
राजकीय अडचणीत सापडलेले मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सोमवारपासून देशात १५ दिवसांकरिता आणीबाणी जाहीर केली आहे.
माले - राजकीय अडचणीत सापडलेले मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सोमवारपासून देशात १५ दिवसांकरिता आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान मालदीवमधील कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती लक्षात घेता तिथे अत्यावश्यक काम नसेल तर जाणे टाळावे अशी सूचना भारत व चीनने आपापल्या नागरिकांना दिली आहे.
मालदीवमधील कैदेत असलेल्या राजकीय बंद्यांची मुक्तता करावी या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास अब्दुल्ला यामीन नकार दिला. त्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी यामीन यांनी आणिबाणी जाहीर केल्याचा आरोप होत आहे.
मालदीवच्या अब्दुल्ला यामीन यांच्या सरकारने रविवारी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलण्याचा प्रयत्न केल्यामुळे देश लष्करी राजवटीच्या काठावर उभा आहे. मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयातील अतिउच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालदीवने भारत आणि इतर लोकशाही देशांना मदतीसाठी विनंती केली आहे.
दरम्यान, माले येथून आलेल्या वृत्तानुसार यामीन यांना सर्वोच्च न्यायालयाने राजकीय कैद्यांना सोडून देण्याचा आदेश देऊन आपल्या मर्यादांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला त्यामुळे तेथील राजकीय संकट अधिक चिघळले आहे.
यामीन हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अब्दुल्ला सईद यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींना त्यांच्यावर खोटे खटले दाखल करून काढून टाकण्याच्या विचारात आहेत. न्यायालयीन प्रशासनाचे प्रमुख हासन सईद यांच्या घरावर लाचेच्या आरोपांवरून छापा घालण्यात आला आणि न्यायाधीशांना धमकावले जात आहे. मालदीवमध्ये कायद्याचे राज्य कायम राहावे यासाठी भारताने कठोर उपाययोजना करण्याची आम्हाला गरज वाटते, असे या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.