मुंबई-मँचेस्टर विमानाचे कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग; ६० भारतीय १३ तास अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 10:28 AM2024-12-02T10:28:34+5:302024-12-02T10:32:13+5:30
मुंबईवरून ब्रिटनला निघालेल्या भारतीय प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईवरून मँचेस्टरच्या दिशेने निघालेल्या गल्फ एअर कंपनीच्या विमानाचे कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
Mumbai Manchester Gulf Air Flight: मुंबई-मँचेस्टर विमानाने ब्रिटनला निघालेले भारतीय प्रवासी अचानक १३ तास कुवैतमध्ये अडकून पडले. मँचेस्टरकडे जात असताना गल्फ एअर कंपनीच्या विमानाचे अचानक कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. बहरीनवरून उड्डाण केल्यानंतर दोन तासात हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. पण, यामुळे ६० भारतीय प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
एका प्रवाशाने एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत भारतीय परराष्ट्र आणि व्यवहार मंत्रालयाचे लक्ष वेधलं. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. आम्ही बहारिनवरून मँचेस्टरच्या दिशेने उड्डाण केले होते. स्वाक ००७७ आपातकालीन परिस्थिती उद्भवल्याने विमान कुवैतमध्ये उतरवण्यात आले आहे. पण, विमानतळावर अधिकारी सांगत आहेत की, फक्त ब्रिटिश आणि युरोपीय नागरिकांनाच हॉटेल उपलब्ध करून दिल्या जातील. कारण त्यांना आगमन व्हिजा मिळू शकतो. तुम्ही यात हस्तक्षेप करू शकता का?, असे या प्रवाशांने म्हटले होते.
त्यानंतर भारतीय दूतावासाने कुवैतमधील गल्फ एअरशी संपर्क करून हा मुद्दा उपस्थित केला. दुतावासातील एक टीम प्रवाशांच्या मदतीसाठी आणि एअरलाईन कंपनीशी समन्वयासाठी विमानतळावर पाठवण्यात आली होती. भारतीय प्रवाशांची विमानतळावरील दोन लाऊंजमध्ये व्यवस्था करण्यात आली.
Gulf Air flight to Manchester finally departed at 0434 hours today carrying stranded Indian passengers among others. Embassy team was on the ground till the flight departed. pic.twitter.com/47GVer4Bs4
— India in Kuwait (@indembkwt) December 2, 2024
गल्फ एअर जीएफ ५ विमानाने मुंबईवरून मँचेस्टरसाठी उड्डाण केले होते. मध्ये बहारिन मार्गे हे विमान निघाले होते. मात्र, कुवैतमध्ये लँडिंग करण्यात आले. ६० भारतीय प्रवासी १३ तास कुवैतमध्ये अडकून पडले होते. या विमानाने सोमवारी सकाळी ४ वाजून ३४ मिनिटाने मँचेस्टरच्या दिशेने उड्डाण केल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली.