Emmanuel Macron: विजयानंतर जनतेत गेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, लोकांनी फेकून मारले टमाटे, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 12:48 PM2022-04-28T12:48:36+5:302022-04-28T12:48:48+5:30
Emmanuel Macron: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पुन्हा एकदा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी मरीन ले पेन यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
Emmanuel Macron:फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पुन्हा एकदा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी मरीन ले पेन यांचा पराभव केला. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पॅरिसमध्ये प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी निवडणूक जिंकल्यानंतर मॅक्रॉन पहिल्यांदाच जनतेपर्यंत पोहोचले. पॅरिसच्या वायव्येकडील सेर्गी येथे ते मतदारांना भेटत होते, तेव्हा त्यांच्यावर टमाटे फेकण्यात आले.
Emmanuel Macron ciblé par un jet de tomates lors de son déplacement à Cergy pic.twitter.com/3J0hXIZSRP
— BFMTV (@BFMTV) April 27, 2022
डेलीमेलच्या वृत्तानुसार, सुरक्षा कर्मचार्यांनी मॅक्रॉन यांना टोमॅटोपासून वाचवण्यासाठी लगेच छत्री उघडली आणि मॅक्रॉनचे डोकेही आपल्या हातांनी झाकले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मॅक्रॉन 'हे जास्त गंभीर प्रकरण नाही' असे म्हणताना ऐकू येत आहेत. या घटनेनंतर त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना तेथून दूर नेले. दुसर्या व्हिडिओमध्ये, एक आंदोलक एका टेबलवरून गर्दीवर उडी मारताना दिसतो, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
रविवारी झालेल्या निवडणुकीत विजय मिळवून मॅक्रॉन पुन्हा एकदा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. मरीन ले पेन यांना सत्ता काबीज करण्यात अपयश आले. निवडणुकीत मॅक्रॉन यांना 58.5 टक्के तर मरीन ले पेन यांना 41.5 टक्के मते मिळाली आहेत. परंतू, मॅक्रॉन यांच्याबद्दल जनतेच्या मनात रोष आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीनंतरही देशात ठिकठिकाणी प्रदर्शने केलेली दिसत आहेत.