भारताच्या स्वातंत्र्यदिनाला न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साज
By शिवराज यादव | Published: August 16, 2017 01:16 PM2017-08-16T13:16:38+5:302017-08-16T16:34:15+5:30
तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेली इमारत पाहताना भारतीयांची छाती अभिमानाने फुलली होती
न्यूयॉर्क, दि. 16 - 15 ऑगस्ट रोजी भारताने आपला 71 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सारे भारतीय देशभक्तीच्या रंगात बुडाले होते. फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर राहत असलेल्या देशवासियांनीही स्वातंत्र्यदिन साजरा केला. विशेष म्हणजे अमेरिकेची सांस्कृतिक ओळख असलेल्या एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साज चढवण्यात आला होता. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इमारतीला विशेष रोषणाई करण्यात आली होती. तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेली इमारत पाहताना भारतीयांची छाती अभिमानाने फुलली होती. शहराच्या कानाकोप-यातून दिसणा-या इमारतीवर तिरंगा सहज पाहता येऊ शकत होता. सिद्धार्थ संघवी यांनी ही छायाचित्रे टिपले असून खास लोकमतसाठी पाठवले आहे.
आणखी वाचा
गुगलकडून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
भारतासोबत या देशांचाही असतो स्वातंत्र्य दिन
झंडा उंचा रहे हमारा! त्यांनी पुराच्या पाण्यात उभे राहत दिली तिरंग्याला सलामी
न्यूयॉर्कमधील मॅनहट्टन परिसरात ही इमारत आहे. या इमारतीची उंची 1250 फूट (381 मीटर) इतकी आहे. इमारतीवरील अँटेनासहित इमारतीची उंची मोजायची ठरल्यास 1454 फूट (443.2 मीटर) इतकी आहे. न्यूयॉर्क - द एम्पायर स्टेट या नावावरुन इमारतीला एम्पायर स्टेट असे नाव देण्यात आले. 1931 मध्ये या इमारतीचं बांधकाम पुर्ण करण्यात आलं. इमारत उभी राहिल्यापासून जवळपास 40 वर्ष सर्वात उंच इमारत असल्याचा मान एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या नावे होता.
1970 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर सर्वात उंच इमारत म्हणून उभी राहिली. 11 सप्टेंबर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा मान पुन्हा एकदा एम्पायर स्टेट बिल्डिंगला मिळाला होता. 2012 मध्ये पुन्हा एकदा वर्ल्ड ट्रेड सेंटर दिमाखात उभा राहिला आणि आपलं श्रेय आपल्याकडे घेतलं.
एम्पायर स्टेट बिल्डिंग अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. जगातील उंच इमारतींमध्ये ती 35 व्या क्रमांकावर आहे.