इमरान खान पाठवतात अश्लिल मेसेज, महिला नेत्याचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 10:33 AM2017-08-02T10:33:07+5:302017-08-02T10:59:50+5:30
पाकिस्तानातील राजकीय पक्ष 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय)चे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इमरान खानवर पार्टीतीलच एका महिला नेत्यानं गंभीर आरोप केले आहेत. ''खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात'', असा खळबळजनक आरोप आयेशा गुलालई यांनी केला आहे.
इस्लामाबाद, दि. 2 - पाकिस्तानातील राजकीय पक्ष 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय)चे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इमरान खानवर त्यांच्याच पक्षातील एका महिला नेत्यानं गंभीर आरोप केले आहेत. ''इमरान खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात'', असा खळबळजनक आरोप आयेशा गुलालई यांनी केला आहे. आरोपांनंतर गुलालई यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे.
पक्षाला सोडचिठ्ठी देताना आयेशा म्हणाल्या की, ''मला माझा प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे. तसेच जेथे सन्मान आणि अब्रूचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी मी कोणतीही तडजोड करू शकत नाही''. गुलालई यांनी पत्रकार परिषद घेऊन खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इमरान खान हे पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख आहेत. ते चारित्र्यहिन असल्याचा खळबळजनक आरोप पक्षाच्या नेत्या गुलालई यांनी केला. पक्षातील इतर महिला नेत्यांचाही छळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, पक्षाने त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान तेहरीक-ए-इन्साफचे नेते शिरीन मजारी यांनी आयेशा यांचे आरोप फेटाळून लावत सांगितले की, ''पक्षानं त्यांना निवडणुकीचं तिकीट दिले नाही, त्यामुळे आयेशा असे आरोप करत आहेत. इमरान खान महिलांचा आदर करतात'', असे सांगत मजारी यांनी या मुद्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे आयेशा यांनी शिरीन मजारी यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. यावेळी त्यांनी खैबर पख्तूनख्वातील तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. पक्षाला सोडचिठ्ठी देतानाच त्यांनी आपण पीएमएलएनमध्ये प्रवेश करणार नसल्याचेही स्पष्ट केले.