ओलीस नाट्याचा शेवट..!

By admin | Published: July 3, 2016 01:44 AM2016-07-03T01:44:02+5:302016-07-03T01:44:02+5:30

बांगलादेशच्या कमांडोंनी इसिसच्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासह एकाला जिवंत पकडून राजधानी ढाका येथील ओलीस नाट्याचा शनिवारी अंत केला. मात्र, तत्पूर्वी दहशतवाद्यांनी

The end of the olympic drama ..! | ओलीस नाट्याचा शेवट..!

ओलीस नाट्याचा शेवट..!

Next

ढाका : बांगलादेशच्या कमांडोंनी इसिसच्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासह एकाला जिवंत पकडून राजधानी ढाका येथील ओलीस नाट्याचा शनिवारी अंत केला. मात्र, तत्पूर्वी दहशतवाद्यांनी २० परदेशी नागरिकांची अमानुष हत्या केली होती. सशस्त्र दलाच्या नेतृत्वाखालील संयुक्त मोहीम सुरू होण्यापूर्वी दहशतवाद्यांनी २० ओलिसांची हत्या केली होती, असे लष्करी मोहिमांचे संचालक ब्रिगेडियर नयीम अश्पाक चौधरी यांनी सांगितले.
यातील बहुतांश जणांना गळे चिरून ठार करण्यात आले, असेही ते म्हणाले. आर्मी पॅरा कमांडो युनिट-१ने या मोहिमेचे नेतृत्व करीत १३ मिनिटांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला, असे चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले. पंतप्रधान शेख हसीना यांनी ओलीस नाट्यात हस्तक्षेपाचे आदेश लष्कराला दिल्यानंतर लष्कराची मोहीम सुरू झाली. या मोहिमेला ‘आॅपरेशन थंडरबोल्ट’ असे सांकेतिक नाव देण्यात आले होते. ठार करण्यात आलेले २० ओलीस परदेशी असून, त्यातील बहुतांश जपानी आणि इटालियन आहेत. दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर होली आर्टीसन बेकरी उपाहारगृहात शोधमोहीम राबवून मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. (वृत्तसंस्था)

शेवटचा हल्ला सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी
दहशतवाद्यांनी ढाका येथील होली आर्टीसन बेकरी उपाहारगृहाला लक्ष्य केले होते. परदेशी दूतावास व वकिलातींची कार्यालये असलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेच्या परिसरात हे उपाहारगृह असून तेथे परदेशी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.

इसिसच्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री या उपाहारगृहावर हल्ला करून अनेकांना ओलीस ठेवले होते. ओलीस नाट्य संपुष्टात आणण्यासाठी लष्कराने शनिवारी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी शेवटचा हल्ला चढविला.
त्यानंतर काही मिनिटांनी पंतप्रधान शेख हसीना यांनी ओलीस नाट्य संपुष्टात आल्याची घोषणा केली. सुरक्षा दलांनी मोहीम फत्ते केली. सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासह एकाला जिवंत पकडल्यानंतर १३ ओलिसांची सुटका केली, असे त्या म्हणाल्या.

अल्लाहचे आभार : लष्करप्रमुख जनरल अबू बेलाल मोहंमद शफीउल हक या वेळी त्यांच्या बाजूला होते. आम्हाला दहशतवाद्यांचा खात्मा करून ओलिसांची सुटका करता येऊ शकली याबद्दल मी अल्लाहचे आभार मानते. एकाही दहशतवाद्याला पळून जाता आले नाही. त्यांच्यापैकी सहा जणांचा खात्मा करण्यात आला तर एकाला जिवंत पकडण्यात आले. बांगलादेशातून हिंसक कट्टरवाद आणि दहशतवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली.

ओलिसांत भारतीय, श्रीलंकन, जपानी नागरिक
सुटका करण्यात आलेल्या ओलिसांत भारतीय, श्रीलंकन आणि जपानी नागरिकांचा समावेश आहे. हल्ल्यात ३० लोक जखमी झाले असल्याचे हसीना यांनी सांगितले. इस्लामिक स्टेटने आपल्या अमाक वृत्तसंस्थेच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, घटनास्थळाची अनेक छायाचित्रेही पोस्ट केली आहेत.

हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे. या लोकांना मुस्लीम कसे म्हणायचे? त्यांना कोणताही धर्म नाही. रमजानच्या तराबी प्रार्थनेचे आवाहन दुर्लक्षून ते लोकांना ठार मारण्यासाठी गेले. त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना ठार केले ते सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. त्यांचा कोणताही धर्म नाही. दहशतवाद हाच त्यांचा धर्म आहे.
- शेख हसीना,
पंतप्रधान, बांगलादेश

Web Title: The end of the olympic drama ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.