किल्ला आणि बेट विकणे आहे... तोसुद्धा वन बीएचकेपेक्षा कमी किंमतीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 01:45 PM2018-06-08T13:45:05+5:302018-06-08T13:45:05+5:30
19 व्या शतकात बांधण्यात आलेला हा किल्ला भरसमुद्रात एका चिमुकल्या बेटावर आहे. या किल्ल्यास स्टॅक रॉक फोर्ट असे नाव आहे.
लंडन- भारतामध्ये किल्ल्याची स्वच्छता आणि देखभालीसाठी कंपनीकडे काम दिल्यावर सर्वच स्तरातून टीका होते. सरकारने किल्ला विकून टाकला अशी ओरडही अनेक किल्ल्यांबाबत ऐकायला मिळते. पण एक ऐतिहासिक किल्ला विकायला काढला असून त्याची किंमत लंडनमधील वन बीएचके फ्लॅटपेक्षाही कमी आहे. 19 व्या शतकात बांधण्यात आलेला हा किल्ला भरसमुद्रात एका चिमुकल्या बेटावर आहे. या किल्ल्यास स्टॅक रॉक फोर्ट असे नाव आहे. इंग्लंडमधील पेम्ब्रोकशायर परगण्याजवळच्या समुद्रात हे बेट आहे. या सर्वाची किंमत 4 लाख युरो ठरवण्यात आली आहे. विशेष म्हणजे लंडनमध्ये एका वनबीएचके घराची किंमत 5 लाख 85 हजार युरो इतकी आहे. त्यामुळे त्याहीपेक्षा कमी किंमतीत बेट व किल्ला विकला जाणार आहे.
नेपोलियनपासून ब्रिटनचे रक्षण व्हावे यासाठी या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले होते. एकेकाळी या किल्ल्यात 150 सैनिक राहात होते आणि त्यांना लढण्यासाठी तोफाही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहिल्या महायुद्धातही या किल्ल्यामध्ये सैनिकांची एक लहान तुकडी ठेवण्यात आली होती. आता केवळ 4 लाख युरो मोजायला तुम्ही तयार असाल तर त्या बेटाचे मालक तुम्ही होऊ शकाल.
या किल्ल्याचा इतिहास जवळजवळ 150 वर्षे जुना आहे. याला ग्रेड-2 असे नामांकन असून 1850 ते 1852 या काळामध्ये त्याचे बांधकाम करण्यात आले . 1859 साली त्यावर गन टॉवर बांधण्यात आला. 2005 साली त्याची किंमत दिड लाख युरो इतकी किंमत होती. त्याचे मालक केवळ पिकनिकसाठी या किल्ल्याचा वापर करत. 1929 साली या बेटावरील सर्व शस्त्रे हलविण्यात आली. त्यानंतर 1932 साली केवळ 160 डॉलर्सना तो विकला गेला. त्यानंतर त्याची मालकी बदलत गेली. कोणालाही हा किल्ला विकत घ्यायचा असेल तर पाणी, वीज आणि सांडपाण्याची व्यवस्था यांची सोय करावी लागेल. तसेच किल्ल्याची डागडुजीही करावी लागेल.