संपूर्ण जग येईल चीनच्या नव्या अण्वस्त्राच्या टप्प्यात, एकाच वेळी १० लक्ष्यांचा वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:46 AM2017-11-21T03:46:30+5:302017-11-21T03:47:30+5:30
जगात कुठेही असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकणारे ‘डाँगफेंग-४१’ (डीएफ-४१) हे अतिप्रगत आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र पुढील वर्षाच्या सुरुवातीस चिनी लष्कराच्या सक्रिय सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
बीजिंग : जगात कुठेही असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकणारे ‘डाँगफेंग-४१’ (डीएफ-४१) हे अतिप्रगत आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र पुढील वर्षाच्या सुरुवातीस चिनी लष्कराच्या सक्रिय सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
चीनने हे क्षेपणास्त्र विकसित करण्यास सन २०१२मध्ये सुरुवात केल्यापासून या महिन्याच्या सुरुवातीस देशाच्या पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेशात त्याची आठवी चाचणी घेण्यात आली, असे ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ दैनिकाने म्हटले आहे. सरकारी ‘ग्लोबल टाइम्स’च्या बातमीनुसार हे क्षेपणास्त्र पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ‘रॉकेट फोर्स’ या क्षेपणास्त्र दलात सन २०१८च्या पूर्वार्धात दाखल होण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते ‘डीएफ-४१’ कदाचित याआधीच लष्करात दाखल होऊन ते अधिक अचूक करण्यासाठी त्याच्या चाचण्या घेतल्या जात असाव्यात.
चीनच्या मुख्य भूमीवरून सोडलेल्या ‘डीएफ-४१’च्या टप्प्यात जगातील कुठलेही लक्ष्य येऊ शकत असल्याने आक्रमक अस्त्राखेरीज इतरांवर वचक ठेवण्यासाठीही चीनला या क्षेपणास्त्राचा सामरिक उपयोग होईल, असे तज्ज्ञांना वाटते. या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगाच्या दसपट (१० मॅच) असल्याने ते सोडल्यापासून जेमतेम एका तासात जगातील कोणत्याही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकेल. (वृत्तसंस्था)
>डीएफ-४१ची गुणवैशिष्ट्ये
कमाल पल्ला- १२ हजार किमी.
कमाल वेग- १० मॅचहून अधिक
अण्वस्त्रे- एकावेळी १० पर्यंत
प्रत्येक अण्वस्त्राने स्वतंत्र लक्ष्यभेद शक्य
घन इंधनटाक्यांचे तीन टप्पे