‘स्पेसवॉक’साठी उद्योजक निघाले अंतराळात; पाच दिवस अंतराळात थांबणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 08:39 AM2024-09-11T08:39:26+5:302024-09-11T08:39:42+5:30
इसाकमन यांनी मंगळवारी पहाटे दोन स्पेसएक्स अभियंत्यासोबत व एका माजी हवाई दल थंडरबर्ड वैमानिकासोबत फ्लोरिडा येथून स्पेसएक्स ९ रॉकेटने अंतराळात उड्डाण केले
केप केनावेरल : अब्जाधीश उद्योजक जेयर्ड इसाकमन यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अंतराळात झेप घेतली. अंतराळात प्रथमच खासगी पद्धतीने स्पेसवॉक करण्याच्या उद्देशाने जेयर्ड यांनी ही अंतराळ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी त्यांनी स्पेसएक्ससोबत खर्च सामायिक केला आहे. स्पेससूट विकसित करणे व त्याची चाचणी घेणे हा मोहिमेचा उद्देश आहे.
सर्व काही नियोजनाप्रमाणे व ठरल्यानुसार झाले तर पहिल्यांदाच एखादा नागरिक अंतराळात स्पेसवॉक करण्याचा विक्रम नोंदवू शकणार आहे. मात्र, हा स्पेसवॉक करताना इसाकमन हे कॅप्सूलपासून दूर जाणार नाहीत.
पाच दिवस अंतराळात थांबणार
स्पेसवॉक हा अंतराळ उड्डाणातील सर्वात धोकादायक भाग मानला जातो. यापूर्वी १९६५ सोवियत संघाच्या विघटनापूर्वी रशियाने अंतराळात यानाची हॅच अर्थात जाळी उघडली होती. रशियानंतर अमेरिकेने यानाचे हॅच उघडले होते. तेव्हापासून खासगी अंतराळवीर याकडे आवडीचे क्षेत्र म्हणून पाहतात.
इसाकमन यांनी मंगळवारी पहाटे दोन स्पेसएक्स अभियंत्यासोबत व एका माजी हवाई दल थंडरबर्ड वैमानिकासोबत फ्लोरिडा येथून स्पेसएक्स ९ रॉकेटने अंतराळात उड्डाण केले. या ५ दिवसांच्या अंतराळ दौऱ्यादरम्यान बुधवारी रात्री जेयर्ड इसाकमन स्पेसवॉक करू शकतात.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून पुढे १ हजार ४०० किलोमीटर उंचीपर्यंत अंतराळवीर जेयर्ड यात्रा करू शकतात. ही यात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाली तर जेयर्ड हे १९६६ मध्ये नासाच्या जेमिनी प्रकल्पा दरम्यानच्या विक्रम मोडतील. चंद्रावर गेलेल्या २४ अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनीच यापुढे अंतर पार केले आहे.