सीरियन स्थलांतरितांचा सायकलवरुन रशियामार्गे युरोपात प्रवेश
By admin | Published: September 13, 2015 02:19 AM2015-09-13T02:19:39+5:302015-09-13T02:19:39+5:30
भूमध्य समुद्राचा सर्वात कठिण आणि जीवावर बेतणाऱ्या मार्गाला काही सीरियन लोकांनी पर्याय शोधला आहे. संपुर्ण युरोपला वळसा घालून रशियामार्गे हे स्थलांतरित नॉर्वेमध्ये जात आहेत.
मॉस्को : भूमध्य समुद्राचा सर्वात कठिण आणि जीवावर बेतणाऱ्या मार्गाला काही सीरियन लोकांनी पर्याय शोधला आहे. संपुर्ण युरोपला वळसा घालून रशियामार्गे हे स्थलांतरित नॉर्वेमध्ये जात आहेत. विशेष म्हणजे युरोपला जाण्यासाठी चक्क सायकलचा वापर ते करत आहेत. इतकेच नव्हे तर या प्रयत्नामध्ये आर्क्टिक वृत्तही त्यांच्याद्वारे ओलांडले जात आहे.
रशिया आणि सीरियाचे मुत्सद्दी आणि राजनैतिक पातळीवर संबंद अत्यंत चांगले आहेत. त्यामुळे सीरियन लोकांना रशियाचा व्हिसा मिळविण्यात कोणतीही अडचण अथवा विलंब होत नाही. त्यामुळे सीरियातून रशियाची राजधानी मॉस्कोला विमानाद्वारे व तेथून हे नागरिक थेट रशियाच्या वायव्य प्रांतातील मुर्मन्स्क गावापर्यंत रेल्वेने जात आहेत. त्यानंतर नॉर्वेच्या सीमेपासून २० किमी अंतरावर निकेल या गावी ते पोहोचतात. रशिया आणि नॉर्वे यांच्यामधील सीमा केवळ वाहनाद्वारे ओलांडणे हाच केवळ कायदेशीर मार्ग आहे. आणि सायकलला वाहनाचा दर्जा असल्यामुळे निकेलमध्ये सायकल विकत घेऊन स्थलांतरित लोक नॉर्वेमध्ये प्रवेश करतात.
सीरियातील हजारो लोक
विविध मार्गांनी युरोपात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांची आर्थिक स्थिती मध्यम असल्याने ट्रेनची तिकिटे तसेच मानवी तस्करांची फी देणे त्यांना परवडते. आता रशियामार्गे जातानाही लागणारे
पैसे भरुन ते युरोपात जायला तयार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नॉर्वे-स्वीडनला का पसंती?
नॉर्वे आणि स्वीडनला सीरियन नागरिक पसंती देत आहेत कारण हे देश तुलनेत शांत समजले जातात. त्याचप्रमाणे पूर्व युरोप आणि बाल्कन देशांपेक्षा येथे राहणीमान व लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे जर्मनी पाठोपाठ स्कँडिनेव्हिअन देशांमध्ये राहण्यासाठी स्थलांतरित धडपडत असतात.
ब्रिटीश नागरिकांचा पाठिंबा : ब्रिटीश नागरिकांनी निर्वासितांच्या बाजूने उभे राहण्याचा निश्चय केला आहे. निर्वासितांच्या हक्कांसाठी हजारो नागरिकांनी सेंट्रल लंडनमध्ये भव्य मोर्चा काढला. पार्क लेन पासून डाऊनिंग स्ट्रीट व नंतर पार्लमेंट स्क्वेअरपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बेन आणि संगीतकार बिली ब्रॅग यांची भाषणे झाली.
जर्मनी तयारीत..
जर्मनीच्या दक्षिणेस असणाऱ्या म्युनिचमध्ये पूर्व युरोपातील लोक अजूनही मोठ्या संख्येने येत आहेत. येत्या आठवड्याभरामध्ये 40000 - सीरयन्स म्युनिचमार्गे जर्मनीत येतील असा अंदाज आहे.
त्यासाठी जर्मनीने वाहतुक व इतर व़्यवस्था सांभाळण्यासाठी मदतीच्या
4000 - तुकड्या पाठविल्या आहेत.
जर्मनीने आपल्या भूमिकेत बदल केल्यानंतर चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि जर्मन लोकांचे कौतुक होत आहे. सीरियन नागरिकांचे जर्मन लोकांनी मनापासून स्वागत केले आहे.