पाकिस्तानच्या निवडणुकीत दहशतवाद्याची एन्ट्री; हाफिज सईदचा मुलगा निवडणूक लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 03:30 PM2023-11-20T15:30:43+5:302023-11-20T15:32:30+5:30
26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा स्वतःच्या पक्षाद्वारे निवडणूक लढवणार आहे.
Pakistan Election : कुख्यात पाकिस्तानीदहशतवादी आणि लष्कर-ए-तैयबाचा, संस्थापक हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद याने 2024 मध्ये होणाऱ्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीसाठी त्याने तयारीही सुरू केली आहे. तलहा सईदला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. अल्लाह-हू-अकबर तहरीक पार्टीद्वारे तलहा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.
पाकिस्तानमध्ये पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या निवडणुकांमध्ये कुख्यात दहशतवादी आणि पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेल्या हाफिज सईदचा मुलगा तलहा सहिदने निवडणुकीची कमान हाती घेतली आहे. विशेष म्हणजे हाफिज सईद तुरुंगात असल्याने मुलाकडेच लष्कर-ए-तैयबाचे नेतृत्व आहे. हाफिज सईद असतानाही तो संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता.
तलहाचे नाव अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील असून, तो अनेक दिवसांपासून आपल्या दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करण्याचे काम करत होता. याआधी हाफिज सईदचा जावई 2018 मध्ये निवडणूक लढला होता. तलहा सईदनेही 2018 मध्ये मूळ गाव सरगोधा येथून निवडणूक लढवली होती. पण, त्या दोघांचा तेव्हा पराभव झाला.
तलहाने पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, तलहा सईद उर्फ हाफिज तल्हा सईद, असे त्याचे पूर्ण नाव आहे. तलहा सईदला 2022 मध्ये भारताने दहशतवादी घोषित केले होते आणि त्याच्यावर लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम केल्याचा आणि भारतातील अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. तलहा सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात चीनने अडथळे आणले होते, त्यामुळे त्याला अद्याप आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करता आले नाही.