तुर्कस्तानात एर्दोगान यांचा पुन्हा वरवंटा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:40 AM2018-07-09T04:40:27+5:302018-07-09T04:40:39+5:30
संसदीय लोकशाहीतून अध्यक्षीय राजवटीत स्थित्यंतर होत असलेल्या तुर्कस्तानात तय्यीप एर्दोगान सर्वशक्तिमान राष्ट्राध्यक्ष म्हणून मंगळवारी शपथ घेण्याआधी निष्ठेबद्दल शंका असलेल्या १८ हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी एकहाती बडतर्फ केले गेले.
अंकारा - संसदीय लोकशाहीतून अध्यक्षीय राजवटीत स्थित्यंतर होत असलेल्या तुर्कस्तानात तय्यीप एर्दोगान सर्वशक्तिमान राष्ट्राध्यक्ष म्हणून मंगळवारी शपथ घेण्याआधी निष्ठेबद्दल शंका असलेल्या १८ हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी एकहाती बडतर्फ केले गेले. यात निम्म्याहून अधिक कर्मचारी पोलीस दलातील आहेत.
दोन वर्षांपूर्वी सत्ता उलथून टाकण्यासाठी झालेली बंडाळी चिरडून टाकताना त्या वेळी पंतप्रधान असलेल्या एर्दोगान यांनी आणीबाणी पुकारून १.६० लाख सरकारी कर्मचाºयांची अशीच हकालपट्टी केली होती. याखेरीज ५० हजारांहून अधिक नागरिकांना देशद्राहाबद्दल अटक करून त्यांच्यावर खटले सुरू आहेत.
दोन आठवड्यापूर्वी झालेल्या संसदीय निवडणुकीत एर्दोगान यांनी बहुमत कायम राखले. एवढेच नव्हे, तर अध्यक्षीय राजवट लागू करण्यासाठी घेतलेले सार्वमतही त्यांनी जिंकले. आता एर्दोगान आधुनिक तुर्कस्तानचे संस्थापक केमाल अतातुर्क यांच्यानंतरचे सर्वात शक्तिमान सत्ताधीश झाले आहेत. मंगळवारी त्यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी व्हायचा आहे व त्याच वेळी आणीबाणीही उठविली जायची आहे. त्याआधी आपले आसन आणखी भक्कम करण्यासाठी एर्दोगान यांनी पुन्हा हा वरवंटा फिरविला आहे.
रविवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार विविध विद्यापीठांमधील १९९ अध्यापक व सुरक्षा दलांतील पाच हजारांहून अधिक कर्मचाºयांनाही घरी पाठविण्यात आले. (वृत्तसंस्था)
सर्व शक्तिमान राष्ट्राध्यक्ष म्हणून एर्दोगान यांचा मंगळवारी शपथविधी व्हायचा आहे. त्याआधी त्यांनी ही साफसफाई केली.