लंडनमध्ये महाराष्ट्रीयन व्यावसायिकांची संस्था स्थापन
By admin | Published: April 13, 2016 02:22 PM2016-04-13T14:22:06+5:302016-04-13T14:22:06+5:30
महाराष्ट्रीयन व्यावसायिकांनी लंडनमध्ये स्थापन केली संस्था
Next
केदार लेले
लंडन, दि. १३ - यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन पहिली महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था नुकतीच लंडनमध्ये स्थापन केली आहे. परदेशात राहून काम करताना या व्यावसायिकांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
ओएमपीईजीचा (OMPEG) उदघाटन सोहळा १० एप्रिल २०१६ रोजी लंडन येथील सडबरी गोल्फ क्लबमध्ये पार पडला. यशस्वी उद्योजक श्री प्रताप शिर्के (शिर्के Constructions व विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे संचालक) आणि माननीय श्री धनंजय मुंगळे (आर्थिक सल्लागार व विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे संचालक) हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
या कार्यक्रमाला ब्रेन्ट शहराच्या महापौर श्रीमती लेस्ली जोन्स तसेच साऊथहॉलचे श्री विरेंद्र शर्मा (ब्रिटीश पार्लमेंटचे खासदार), डॉ ओंकार साहोटा, (लंडन असेंब्ली मेंबर), श्री उदय ढोलकीया (चेयरमन NABA, यु.के.) हे विषेश अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात OMPEG च्या संकेतस्थळाचे (www.ompeg.org.uk) उदघाटन तसेच "महाराष्ट्रीयन उद्योजकता" या विषयावर एक चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांबरोबरच स्थानिक व्यवसायिक व उद्योजक – डॉ महादेव भिडे (आय. व्ही.एफ स्पेशलीस्ट), मनोज वसईकर (फाईन डायनिंग शेफ) यांनीही भाग घेतला.
विविध प्रश्नांनी रंगले OMPEGचे चर्चा सत्र
उपस्थित प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना श्री प्रताप शिर्के यांनी "OMPEG ने वर्ष २०२० पर्यंत २० नवे उद्योग / कंपन्या नक्की यशस्वी कराव्या" असे आव्हानात्मक लक्ष्य सुचवले.
विविध प्रश्नांनी रंगलेल्या या चर्चासत्रात श्री प्रताप शिर्केंनी सांगितलेल्या शंतनुराव किर्लोस्करांच्या आठवणींनी, उदय ढोलकीयांनी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची थोर आर्थिक दूरदृष्टी यावरील संदर्भांमुळे, मनोज वसईकरांच्या व्यवसायाच्या जागेंचे करार वाचावे का नाही यावरील अनुभवांनी आणि महादेव भिडे यांच्या महाराष्ट्रीयन उद्योजकतेच्या काही मार्मिक उदाहरणांनी एकदम धमाल उडाली व उपस्थित प्रेक्षकांनी चर्चेचा भरपूर आस्वाद घेतला.
सभासदांना OMPEGचा मोमेंटो प्रदान
युकेमधील विविध भागातून आलेल्या अनेक महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांनी या कार्यक्रमास हजर राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व OMPEG च्या पुढील कार्यक्रमांसाठी मौलिक अभिप्राय आणि सूचना दिल्या तसेच सहभागाचे आश्वासन दिले. जय तहसीलदारांच्या मरक्युरिअस या आय टी. कंपनी तर्फे सर्व सभासदांना OMPEGचा मोमेंटो देण्यात आला.
OMPEGचे मुख्य उद्देश
OMPEG या संस्थेचे प्रमुख उद्येश्य हे युकेमधील हजारोने पसरलेल्या महाराष्ट्रीयन व्यवसायिक व उद्योजकांना एकत्र आणून नवीन संधी व प्रोत्साहन उपलब्ध करुन देणे तसेच तरुण उद्योजकांना मार्गदर्शनाच्या संधी उपलब्ध करुन देणे हा आहे.
सूत्र संचालन
OMPEG या संस्थेचे संस्थापक सभासद - श्री दिलीप आमडेकर, श्री हिमांशु दसरे, श्री रविंद्र गाडगीळ, सौ मंजिरी गोखले जोशी, श्री अनिरुद्ध कापरेकर, श्री सुशील रापतवार व श्री जय तहसीलदार - या सर्वांनी या उद्घाटन सोहळ्याचे संचालन केले.
या समारंभात माजी क्रिकेटपटू व आर्थिक सल्लागार, श्री मधु गुप्ते यांचाही पुढाकार होता आणि युकेमधील महाराष्ट्रीयन समाजात उद्योजकता रुजवायच्या या उपक्रमाबद्दल सर्वांनी दृढ विश्वास, उत्साह व आनंद व्यक्त केला.