थंडीने युरोप गारठला, रुमानियात नीचांकी तापमान
By admin | Published: January 21, 2016 04:21 PM2016-01-21T16:21:49+5:302016-01-21T16:21:49+5:30
घसरलेल्या तापमानाचा सर्वाधिक फटका रुमानियाला बसला असून या हंगामातील सर्वात थंड म्हणजे उणे २९.८ अंश सेल्सिअस इतके तापमान रुमानियातील इंतोरसुरा ब्रुझाउलोइ गावात नोंदविले गेले
Next
>ऑनलाइन लोकमत
बुखारेस्ट, दि. २१ - पूर्व युरोप तसेच बाल्कन देशांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. घसरलेल्या तापमानाचा सर्वाधिक फटका रुमानियाला बसला असून या हंगामातील सर्वात थंड म्हणजे उणे २९.८ अंश सेल्सिअस इतके तापमान रुमानियातील इंतोरसुरा ब्रुझाउलोइ गावात नोंदविले गेले. रुमानियात सध्या सरासरी तापमान उणे १३ अंश ते उणे १ अंश यामध्येच नोंदविले जात आहे. तर कमाल तापमान एकदाच ३ अंश इतके नोंदविले गेले. रुमानियातील २००० मी उंचीवरील बॅलेक लेक या ग्लेशिअर तळ्यास पाहण्यास गेलेल्या ७० पर्यटकांना केबल कार तुटल्यामुळे थंडीचा सामना करत तेथेच राहावे लागले, त्यामध्ये ४५ इस्रायली नागरिकांचा समावेश आहे. अखेर या पर्यटकांची सुटका हेलिकॉप्टरच्या सहाय्याने करण्यात आली. त्याचप्रमाणे बाल्कन देशांमध्येही तापमान घसरल्यामुळे स्थलांतर करणा-या सीरियन नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. मॅसिडोनिया आणि सर्बिया येथे सध्या उणे १९ इतके तापमान आहे तर ग्रीसमध्येही कडाक्याची थंडी पडली आहे. याचप्रमाणे झेक रिपब्लिकनमध्येही तापमान शून्याच्याखाली गेले आहे. त्यामुळेच सीरियन स्थलांतरितांना पश्चिम युरोपच्या वाटचालीमध्ये अडथळे येत आहे.
उत्तर अमेरिकेच्या पूर्व आणि आग्नेय किना-यावर येत असलेल्या वादळामुळे फ्लोरिडाच्या आसपास तापमान घसरण्याची आणि बर्फवृष्टी व जोरदार पावसाची शक्यता वतर्विण्यात आलेली आहे. न्यू ऑर्लिन्स, पिटसबर्ग, न्यू यॉर्क, वॉशिंग्टन, नॅशविल, बॉस्टन यांना या पावसाचा तडाखा बसू शकतो, असा अंदाज आहे.