Europe Heatwave: भीषण संकट; उष्णतेच्या लाटेने स्पेन, पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये 1700 हून अधिक मृत्यू; हजारो हेक्टर जंगल नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 09:06 PM2022-07-20T21:06:14+5:302022-07-20T21:07:16+5:30
Europe Heatwave: जगातील 7 देश सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेशी झुंज देत आहेत. यामुळे आतापर्यंत 1700 लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
Europe Heatwave: सध्या जगातील अनेक देशांवर भीषण संकट ओढावले आहे. जगातील 7 देश सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेशी झुंज देत आहेत. ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यांदाच पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. याआधी 2019 मध्ये सर्वाधिक तापमान 39.1 अंश नोंदवले गेले होते. अहवालानुसार, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, स्पेन आणि ग्रीसमध्ये उष्णतेने कहर केला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जंगलांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तापमानात आणखी वाढ होत आहे.
आतापर्यंत 1700 लोकांचा मृत्यू
ब्रिटनमधील लिंकनशायर आणि हिथ्रो विमानतळांवर मंगळवारी 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. 33 ठिकाणी पारा 38.7 अंश सेल्सिअस राहिला. राजधानी लंडनसह मध्य, उत्तर आणि दक्षिण-पूर्व इंग्लंडच्या भागात उष्णतेच्या लाटेसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. ब्रिटनमध्ये उष्णतेने रस्त्यांवरील डांबर वितळत असून, शाळांनाही बंद करण्यात आले आहे. तिकडे, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये एका आठवड्यात 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अनेक ठिकाणी आगीच्या घटना
या उष्णतेच्या लाटेमुळे अनेक ठिकाणाहून आग लागल्याची माहिती समोर येत आहे. पूर्व लंडनमधील वेनिंग्टनमध्ये येथे अनेक घरांना आग लागली. तिकडे स्पेनमध्ये 36 भागात जंगलाला आग लागली आहे. 70 हजार हेक्टर जंगल नष्ट झाले आहे. सुमारे 13 हजार लोकांना घरे सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. दक्षिण-पश्चिम स्पेनमध्ये पारा 44 अंश सेल्सिअसच्या वर आणि उर्वरित देशामध्ये 40 अंशांपर्यंत वाढला आहे. 10 ते 17 जुलै दरम्यान उष्णतेमुळे सुमारे 678 जणांचा मृत्यू झाला आहे.
जंगले जळून नष्ट
पोर्तुगालची परिस्थिती काही वेगळी नाही. उष्णतेच्या लाटेने येथेही कहर केला आहे. जंगल भागात आग लागली असून, सुमारे 160 जण जखमी झाले आहेत. शेकडो लोकांना घर सोडावे लागले. पोर्तुगालमध्ये 2017 नंतर अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. 17 जुलै रोजी आगीवर नियंत्रण मिळवण्यात गुंतलेले अग्निशमन विमान येथे कोसळले, यात वैमानिक ठार झाला. पोर्तुगालमध्ये वाढत्या तापमानामुळे 7 ते 18 जुलै दरम्यान 1 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, बुधवारी तापमान कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.
अमेरिकेतही मोठे हाल
अमेरिकेतही उष्णतेमुळे लोकांचे मोठे हाल झाले आहेत. नॅशनल ओशियनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशननुसार - बुधवार आणि गुरुवारी अमेरिकेच्या अनेक भागात तीव्र उष्णता येऊ शकते. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी 25 टक्के म्हणजे 80 दशलक्ष लोक या उष्णतेच्या चपळाईत असू शकतात. टेक्सास, लॉस एंजेलिस, ओक्लाहोमा आणि मिसिसिपी या यूएस शहरांमध्ये बुधवार आणि गुरुवारी तापमान 40-50 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तिकडे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मंगळवारी तापमान 40.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले.