युरोपात विजेच्या मागणीत घट, जीवाश्म इंधन टाळणार, स्वच्छ ऊर्जाच वापरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 11:33 AM2024-09-01T11:33:50+5:302024-09-01T11:34:18+5:30
Electricity News: हवामान बदलाच्या दुष्परिणामांचा त्रास जगभर होऊ लागला आहे. तापमान वाढीमुळे जगाच्या अस्तित्त्वालाच धोका निर्माण झाला आहे. हे थांबवण्यासाठी आता युरोपातील देशांनी कंबर कसली आहे. युरोपतील देशांनी जानेवारी ते जून या कालखंडात पारंपरिक विजेजा वापर कमी केला आहे.
पॅरिस - हवामान बदलाच्या दुष्परिणामांचा त्रास जगभर होऊ लागला आहे. तापमान वाढीमुळे जगाच्या अस्तित्त्वालाच धोका निर्माण झाला आहे. हे थांबवण्यासाठी आता युरोपातील देशांनी कंबर कसली आहे. युरोपतील देशांनी जानेवारी ते जून या कालखंडात पारंपरिक विजेजा वापर कमी केला आहे. त्यासाठी होणारा जीवाश्म इंधनाचा वापरही कमी झाला आहे. स्वच्छ ऊर्जा थिंक टँकच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. मागच्या वर्षीच्या समान कालावधीचा विचार करता या देशांनी वीजनिर्मीतीसाठी जीवाष्म इंधनाचा वापर १७ टक्के कमी केला आहे. ११ देशांनी हा वापर २० टक्के कमी केला तर ऑस्ट्रिया, बुल्गारिया, पोर्तुगाल, एस्टोनिया, फिनलंड या देशांनी ३० टक्के इतका कमी केला आहे. (वृत्तसंस्था)
स्वच्छ विजेसाठी देश सरसावले
यामुळे कोळशापासून वीजनिर्मीती २३ टक्के तर गॅसपासून वीजनिर्मीती १३ टक्के कमी झाली आहे. त्याचवेळी सौर ऊर्जेची निर्मिती १३ टक्के तर पवन ऊर्जेची निर्मिती ५ टक्के वाढली आहे.
ग्रीस, रोमानिया यांनी पहिल्यांदा स्वच्छ ऊर्जेचे लक्ष ५० टक्के पार केले आहे. डेन्मार्क आणि पोर्तुगालने हे उद्दिष्ट ७५ टक्के पर्यंत गाठले आहे. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, फिनलंड, इटली, पोलंड, स्लोव्हेनिया आदी देशांमध्ये जीवाष्म इंधनाचा वापर या शतकाचा विचार करता सर्वात कमी झाला आहे.
युद्धाने चित्र बदलले
मागच्या वर्षी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे गॅसच्या किमती कमालीच्या वाढल्या. त्यामुळे देशांनी काटकसरीच्या उपाययोजनांचा अवलंब केला. थंडीच्या काळातही सहा महिन्यात विजेची मागणी ५ टक्क्यांनी कमी झाली. या वर्षी मे आणि जूनमध्ये कोळशाच्या मागणी विक्रमी घट नोंदवण्यात आली.
युरोपचा काय संकल्प?
युरोपची पारंपरिक विजेची मागणी २०२२ मध्ये ८ टक्के कमी झाली आहे. युरोपियन युनियनने या दशकाच्या अखेरीपर्यंत ग्रीन हाऊस वायूंचे उत्सर्जन ६५ टक्केपर्यंत कमी करण्याचा तर २०४५ पर्यंत १०० टक्के बंद करण्याचे उद्दिष्ट आहे.