गाझा रिकामे करा, अन्यथा...; इस्रायलचा पॅलेस्टिनी नागरिकांना इशारा, विमानातून अरबी पत्रके
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 05:23 AM2023-10-23T05:23:49+5:302023-10-23T05:24:11+5:30
इस्रायलने गाझा पट्टीवर जमिनीवर हल्ले केले तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा हिजबुल्लाहने दिला आहे.
रफाह (गाझा पट्टी) : इस्रायलने पुन्हा उत्तर गाझामध्ये अरबी भाषेत लिहिलेली पत्रके हवेतून टाकत पॅलेस्टिनी लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला. इस्रायली लष्कराने लोकांना सांगितले की, त्यांनी हा परिसर रिकामा केला नाही, तर ते हमास या दहशतवादी संघटनेचे मानले जातील. गाझामधून आतापर्यंत सात लाख लोकांनी पलायन केले आहे. गाझामध्ये हमासने मोठ्या प्रमाणावर भूमिगत बोगदे तयार केले आहेत. जमिनीवरून हल्ले केल्यास अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती आहे. त्यामुळे वारंवार शहर खाली करण्यासाठी इस्रायलकडून सांगण्यात येत आहे.
अकाली जन्मलेल्या बाळांना धोका
जनरेटर इंधनाच्या कमतरतेमुळे कमीतकमी १३० अकाली जन्मलेल्या बाळांना ‘गंभीर धोका’ असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. उत्तर गाझामधील सात रुग्णालये वीज आणि पुरवठा नसल्यामुळे, इस्रायलच्या बंदीच्या आदेशाने बंद करण्यात आली आहेत. रुग्ण सतत येत असून अंधारात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
इस्रायलकडून दिवसरात्र हवाई हल्ले
इस्रायल- हमास युद्धाच्या १५व्या दिवशीही इस्रायली युद्धविमानांनी गाझा ओलांडून रात्रभर हवाई हल्ले केले. हल्ल्यामुळे सीरियातील अलेप्पो आणि दमास्कसच्या विमानतळांच्या धावपट्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. वेस्ट बँकमधील एक मशिदीवरही इस्रायलकडून हवाई हल्ला करत ती नष्ट करण्यात आली.
‘आमची भूमिका महत्त्वाची’
इस्रायलचा हिजबुल्लाहशी सुरू असलेल्या संघर्षामुळे वेस्ट बँकमधील तणाव वाढत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आपली ‘महत्त्वाची भूमिका’ असल्याचे हिजबुल्लाहने म्हटले असून इस्रायलने गाझा पट्टीवर जमिनीवर हल्ले केले तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.