"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 04:40 PM2024-10-06T16:40:23+5:302024-10-06T16:41:32+5:30
इस्रायली लष्कराने रविवारी (6 ऑक्टोबर) सकाळी एका मशिदीवर हवाई हल्ला केला. आयडीएफने केलेल्या दाव्यानुसार, हमास मशिदी आणि शाळाचा वापर कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून करत आहे.
इस्रायल लेबनॉनवर सातत्याने जबरदस्त हल्ले करत आहे. इस्त्रायली लष्कराने बेरूतच्या दक्षिण उपनगरावर 30 हून अधिक हवाई हल्ले केले आहेत. हे आतापर्यंतचे सर्वात हिंसक हल्ले होते, असे लेबनीज मीडियाने म्हटले आहे. तर आपण हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्रांच्या डेपोला लक्ष्य केल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
इस्रायली लष्कराने रविवारी (6 ऑक्टोबर) सकाळी एका मशिदीवर हवाई हल्ला केला. आयडीएफने केलेल्या दाव्यानुसार, हमास मशिदी आणि शाळाचा वापर कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून करत आहे. या हवाई हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.
हिजबुल्लाहचा इस्रायली सेन्यावर हल्ला केल्याचा दावा -
हिजबुल्लाहने मनारा येथे इस्रायली सैनिकांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. हिजबुल्लाहने रविवारी उत्तर इस्रायलमधील मनारा येथे इस्रायली सैनिकांवर रॉकेट आणि क्षेपणास्त्रांसह तीन हल्ले केले. यापूर्वी, हिजबुल्लाहने ब्लिडा येथील खालेट शुएबच्या माध्यमातून लेबनॉनमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या इस्रायली सैनिकांवर हल्ला केल्याचा दावाही केला होता. तेव्हा या हल्ल्यांमुळे इस्रायली सैनिकांना माघार घ्यावी लागली होती, असे हिजबुल्लाहने म्हटले होते.
गाझावरही इस्रायलचे हल्ले सुरूच -
संपूर्ण उत्तर गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच आहे. इस्रायली सैन्याने उत्तर गाझाचा मोठा भू-भाग रिकामा करण्यास सांगितले आहे. इस्रायली लष्कराचे अरबी प्रवक्ते अविचाय अद्राई यांनी म्हटले आहे की, "हमासने या भागात दहशतवादी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. ते येथील लोकांचे शोषण करत आहेत. याशिवाय ते येथील लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहेत. इस्रायली सैन्य दहशतवादी संघटनांविरोधात बलपूर्वक कारवाई करत राहील, हे लोक राशीद स्ट्रीट (समुद्र) आणि सलाह अल-दिन स्ट्रीटकडे जाऊ शकतात."