कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:33 PM2024-11-06T16:33:09+5:302024-11-06T16:33:29+5:30
२०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडन यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र पराभवाचा धक्का बसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. कमला या सध्या अमेरिकेच्या उप राष्ट्राध्यक्ष आहेत. कमला यांना आता काही दिवसांत राजीनामा द्यावा लागणार आहे. कमला यांनी राजीनामा दिला तरी देखील उपराष्ट्राध्यक्ष पद भारतीय वंशाच्या महिलेच्या पतीला मिळण्याची शक्यता आहे.
कमला यांची जागा रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार जेडी वेन्स घेणार आहेत. जेडी वेन्स हे भारताचे जावई आहेत. भारतीय वंशाच्या उषा यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. उषा वेन्स यांचे आई-वडील हे लक्ष्मी आणि राधाकृष्ण चिलुकुरी हे आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील पामर्रु गावातील रहिवासी आहेत. नोकरीच्या निमित्ताने ते अमेरिकेत गेले होते. अमेरिकेतच उषा यांचा जन्म झाला. सॅन डिएगोमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. येल विद्यापीठातून त्यांनी इतिहासात बीए आणि केंब्रिजमधून एमफिल केले आहे. येलमधून त्यांनी वकीलीचे शिक्षण घेतले आहे.
उषा यांनी २०१४ मध्ये जेडी वेंस यांच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले होते. वेन्स दाम्पत्याला तीन मुले आहेत. यापैकी एका मुलाचे नाव इवान, विवेक आणि मुलीचे नाव मिराबेल आहे. पती निवडणुकीला उभा असल्याने उषा देखील प्रचारात उतरल्या होत्या.
२०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडन यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र पराभवाचा धक्का बसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. तसेच त्यांनी आक्रमक प्रचार करत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीही मिळवली होती. त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांनी आव्हान उभं केलं होतं. मात्र अटीतटीची मानली जाणारी ही अध्यक्षीय निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. आता अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती म्हणून ते जानेवारी महिन्यात शपथ घेतील.