चीनसोबत संबंध बिघडले, तरीही आम्ही मार्ग काढू; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:29 AM2024-07-30T05:29:49+5:302024-07-30T05:30:01+5:30
क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित जयशंकर यांनी भारताचे चीनसोबतचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले.
टोकियो: भारत - चीन सीमा विवादात कोणत्याही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप करण्याची गरज नसून, दोन शेजारी देशांमधील समस्येवर तोडगा दोघांनीच शोधला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमा वादावर घेतली.
क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येथे आलेल्या जयशंकर यांनी भारताचे चीनसोबतचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, चीन आणि भारतातील वादावर साहजिकच, जगातील इतर देशांनाही या विषयात रस असेल. कारण, आम्ही दोन मोठे देश आहोत आणि आमच्या संबंधांचा जगावर परिणाम होतो. मात्र, आमच्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही इतर देशांकडे मदत मागितली नसल्याचे त्यांनी सांगितले.
क्वाडमध्ये कोण?
परराष्ट्र मंत्री जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन, जपानच्या परराष्ट्र मंत्री योको कामिकावा आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
चीनला दिला थेट इशारा
येथे कोणताही देश दुसऱ्यावर वर्चस्व ठेवत नाही आणि प्रत्येक राष्ट्र सर्व प्रकारच्या दबावांपासून मुक्त असेल, असे थेट मत क्वाड गटाच्या सदस्य देशांनी केले. चीनचे थेट नाव न घेता, चार परराष्ट्र मंत्र्यांनी समुद्रातील परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.
चीन म्हणतो...
क्वाडने विकास थांबविण्यासाठी कृत्रिमपणे तणाव निर्माण केल्याचा आरोप चीनने केला आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटले की, हे देश मतभेद पेरण्यासाठी, संघर्ष निर्माण करण्यासाठी वाद निर्माण करत आहेत. प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी हा मोठा धोका आहे,