गाझातील रुग्णालयही वाटेना लोकांना सुरक्षित; अर्भकांसह अनेकांचे जीव धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 08:30 AM2023-11-14T08:30:21+5:302023-11-14T08:30:32+5:30
रुग्णालयातून पलायन करून सुरक्षित ठिकाणी जाऊ पाहणाऱ्यांच्या जिवाला धोका आहे.
देर अल-बालाह : इस्रायलने अधिक तीव्र हल्ले चढविण्यास सुरुवात केल्याने गाझातील शिफा या सर्वांत मोठ्या रुग्णालयात आश्रय घेतलेल्या काही हजार नागरिकांनी तिथूनही पलायन केले आहे. रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराबाहेरच हमासचे दहशतवादी व इस्रायलच्या लष्करात धुमश्चक्री सुरू आहे. शिफा रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अर्भकांसह शेकडो रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत.
शिफा रुग्णालयाच्या इमारतीच्या चहुबाजूंनी सातत्याने गोळीबार सुरू आहे. त्यामुळे रुग्णालयातून पलायन करून सुरक्षित ठिकाणी जाऊ पाहणाऱ्यांच्या जिवाला धोका आहे.
युरोपीय देशांकडून हमासचा तीव्र निषेध
हमास रुग्ण व नागरिकांचा मानवी ढालीसारखा उपयोग करत आहे. त्याबद्दल युरोपियन युनियनमधील देशांनी हमासचा निषेध केला आहे.
युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रमुख जोसेप बोरेल यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर मानवी संहार होऊ नये याची काळजी इस्रायलने घेतली पाहिजे. युरोपीय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली. त्यामध्ये ही मते मांडली गेली.