प्रत्येक संकटात भारताची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2016 12:53 AM2016-06-05T00:53:27+5:302016-06-05T00:53:27+5:30
राजकीय व भौगोलिक अडथळे असताना तसेच आपल्या येथील दूतावासांवर दहशतवादी हल्ले होऊनही भारत युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या प्रत्येक भागात सहकार्य करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली.
हेरात : राजकीय व भौगोलिक अडथळे असताना तसेच आपल्या येथील दूतावासांवर दहशतवादी हल्ले होऊनही भारत युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या प्रत्येक भागात सहकार्य करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण हेरात प्रांतातील अफगाण-भारत मैत्री धरणाचे पंतप्रधान मोदी व अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. त्यानंतर मोदी बोलत होते.
दहशतवाद धुडकावल्याबद्दल अफगाण जनतेची प्रशंसा करून मोदी म्हणाले की, तुमच्यातील दुफळीचा केवळ या राष्ट्रावर बाहेरून वर्चस्व गाजवू पहाणाऱ्यांनाच लाभ होईल. अफगाणिस्तानातील युद्ध राष्ट्र निर्मितीचे नव्हते, तर त्याने येथील एका पिढीचे भविष्य हिसकावून घेतले. शूर अफगाण जनता विध्वंस व मृत्यूच्या दूतांना थारा दिला जाणार नाही, असा संदेश देत आहे. दहशतवादाचा पराभव करण्यात अफगाणिस्तानला जेव्हा यश येईल तेव्हा जग अधिक सुरक्षित आणि सुंदर होईल, असेही ते म्हणाले.
अफगाणिस्तानसोबत उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या सहकार्याचा या युद्धग्रस्त देशाच्या प्रत्येक भागापर्यंत विस्तार केला जाईल व या भागीदारीचा अफगाण समुदायाच्या प्रत्येक भागाला लाभ मिळेल. मोदी गनींच्या उपस्थितीत म्हणाले की, ‘तुमच्या डोळ्यात मी भारताबद्दल अपार प्रेम पाहिले आहे. तुमच्या स्मित हास्यात मी या संबंधांचा आनंद पाहिला आहे. तुमच्या दृढ मिठीत मी आमच्या मैत्रीचा विश्वास अनुभवला आहे.
७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली
अफगाण-भारत मैत्री धरण इराण सीमेलगतच्या हेरात प्रांतात आहे. चिस्त- ए- शरीफ भागात हरिरूड नदीवरील हे धरण आधी सलमा धरण म्हणून ओळखले जात होते. भारताने तब्बल
1700
कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या धरणामुळे ७५ हजार
हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
शिवाय ४२ मेगावॅट वीज निर्मितीही होणार आहे. हे धरण विटा आणि सिमेंटने नाही तर आमच्या मैत्रीचा विश्वास आणि अफगाणी, भारतीयांच्या साहसातून साकार झाले आहे. अफगाण लोक आपले चांगले भवितव्य घडविण्यासाठी खूप उत्सुक असून, ते त्याला पात्र आहेत, असे त्यांनी म्हटले.
आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात मोदींनी अफगाणची शांतता प्रक्रिया, हेरातमध्ये भारतीय दूतावासावर झालेला दहशतवादी हल्ला आणि देशाच्या पुनर्उभारणीच्या कामाशी संबंधित मुद्यांना स्पर्श केला. तुमच्या देशात लोकशाहीची पाळेमुळे घट्ट व्हावीत, असे ते म्हणाले.