‘या’ देशात प्रत्येक व्यक्ती जन्माला येते तीनदा; वयाचा घोळ कायमचा मिटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 05:54 AM2022-04-30T05:54:08+5:302022-04-30T05:54:31+5:30
दक्षिण कोरियात वय मोजण्याच्या एकूण तीन पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत अतिशय पुरातन आहे. वय मोजण्याची अतिशय वेगळी अशी एक परंपरा तिथे आहे.
जगभरात तुम्ही कुठेही जा, जन्मतारीख सगळ्यात महत्त्वाची. जन्मतारखेनुसारच अनेक गोष्टी ठरतात. तुम्हाला शाळेत प्रवेश मिळणार की नाही? कधी मिळेल? तुम्हाला किती वर्षं नोकरी करता येईल? तुम्ही कधी निवृत्त व्हाल? कोणत्या सुविधा वयाच्या कोणत्या वर्षी आणि कधीपासून सुरू होतील?.. तुम्हाला परदेशात जायचं असेल, कुठली सरकारी कागदपत्रं हवी असतील किंवा तुमचं कोणतंही छुटुर फुटूर काम असू द्या.. जन्मतारखेशिवाय काहीच चालत नाही आणि हलत नाही. जन्माचा, जन्मतारखेचा अधिकृत पुरावा लागतो. भले तुमची ‘खरी’ जन्मतारीख वेगळी असू द्या, पण कागदोपत्री मात्र सगळीकडे एकच जन्मतारीख असावी लागते.. नाहीतर फसवेगिरीचा आरोप होऊन तुरुंगाची वारीही करावी लागू शकते.. अख्ख्या जगात हाच नियम आहे. कारण माणसाचा जन्म एकदाच आणि त्या ठरावीक दिवशी, ठरावीक तारखेलाच झालेला असतो..
दक्षिण कोरियात मात्र सगळंच उलटंपालटं आहे. इथे एकाच माणसाचा तब्बल तीन वेळा जन्म होतो! दक्षिण कोरियातल्या कोणत्याही माणसाला तुम्ही त्याची जन्मतारीख विचारली, तर तो तीन जन्मतारखा सांगेल किंवा तुम्हाला कोणती जन्मतारीख, कोणत्या कामासाठी हवीय, ते विचारेल!..शेकडो वर्षांपासून दक्षिण कोरियात ही पद्धत चालू आहे. अर्थातच त्यामुळे दक्षिण कोरियन नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. विशेषत: परदेशी जाताना, पासपोर्ट, व्हिसा काढताना, शिक्षणासाठी दुसऱ्या देशात जातांना त्यांचा जीव अक्षरश: मेटाकुटीला येतो. कारण सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करता करता त्यांना अनेक दिव्यातून पार पडावं लागतं. तुम्ही म्हणाल, असं का? एकाच माणसाचा तीन तीन वेळा जन्म कसा होतो किंवा एकाच व्यक्तीच्या तीन तीन जन्मतारखा कशा?- तर ‘त्यांच्याकडे तशीच परंपरा आहे म्हणून’! - त्याला दुसरं काही उत्तर नाही.
दक्षिण कोरियात वय मोजण्याच्या एकूण तीन पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत अतिशय पुरातन आहे. वय मोजण्याची अतिशय वेगळी अशी एक परंपरा तिथे आहे. मूल जन्माला येताच ते एक वर्षांचं असल्याचं तिथे मानलं जातं. त्यानंतर येणाऱ्या १ जानेवारीला ते दोन वर्षांचं मानलं जातं. १ जानेवारीला प्रत्येकाचंच वय एक वर्षांनं वाढतं, मग त्याचा जन्म कोणत्याही महिन्याचा आणि कोणत्याही तारखेचा असो! काही जणांच्या मते मूल पोटात असतानाच त्या बाळानं नऊ महिन्यांचा काळ घेतलेला असतो. तो कालावधी साधारणपणे एक वर्षांचा मानला तर मूल जन्माला येतं त्यावेळी त्यानं आपल्या वयाचं एक वर्षं पूर्ण केलेलं असतं, असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेक चमत्कृतीपूर्ण घटनाही तिथे घडतात. समजा एखादं मूल ३१ डिसेंबरला जन्माला आलं, तर २४ तासांच्या आत ते दोन वर्षांचं होतं. कारण १ जानेवारीला प्रत्येकाचं वय एक वर्षानं वाढतं. दक्षिण कोरियामध्ये हीच पद्धत गेल्या अनेक शतकांपासून प्रचलित आहे.
ही पद्धत दक्षिण कोरियात आली, ती चीनकडून. चीनसह अनेक देशांत प्राचीन काळी ही पद्धत वापरली जात होती. विशेषत: आशिया खंडात ही पद्धत प्रचलित होती, कारण त्याकाळी शून्याचा शोधच लागलेला नव्हता. नंतर चीनसह सगळ्याच देशांनी जन्मतारखेची ही कालबाह्य पद्धत सोडून दिली; पण दक्षिण कोरियात मात्र ती अजूनही सुरू आहे. वय मोजण्याची दुसरी पद्धत म्हणजे मूल जन्माला आल्यावर त्याचं वय शून्य मानलं जातं, पण १ जानेवारीला ते एक वर्षाचं होतं. म्हणजेच एखादं मूल ३१ डिसेंबरला जन्माला आलं, तर १ जानेवारीला ते एक वर्षाचं होईल ! म्हणजे ३१ डिसेंबर या एकाच दिवशी जन्माला आलेलं मूल पहिल्या पद्धतीनुसार १ जानेवारीला; २४ तासांच्या आत दोन वर्षांचं, तर दुसऱ्या पद्धतीनुसार एक वर्षांचं पूर्ण होतं.
वयाच्या या घोळामुळे अनेक अडचणी यायला लागल्यानं दक्षिण कोरियानं वय मोजण्याची तिसरी पद्धत सुरू केली. अर्थात पहिल्या दोन्ही पद्धतीही तिथे कायम आहेच. प्रशासकीय सोयीसाठी १९६२पासून वयाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय पद्धत त्यांनी अवलंबायला सुरुवात केली. त्यामुळे दक्षिण कोरियात वय मोजण्याच्या आता एकूण तीन पद्धती आहेत. वयाच्या बाबतीत तिथे इतके घोळ असले तरी, ‘वय’ ही गोष्ट तिथे अतिशय गांभीर्यानं घेतली जाते हे विशेष!
वयाचा घोळ कायमचा मिटणार?
वय मोजण्याचा हा घोळ आता कायमचा मिटवण्याचा निर्धार दक्षिण कोरियाचे नवे राष्ट्रपती यूं सोक योल यांनी केला आहे. याआधीही काही खासदारांनी असा प्रयत्न केला होता; पण तो यशस्वी झाला नव्हता. आपल्याकडे नवीन वर्षं जसं दोन पद्धतीनं साजरं केलं जातं; पहिलं म्हणजे १ जानेवारीला आणि दुसरं तिथीनुसार गुढीपाडव्याला, तसंच दक्षिण कोरियात नववर्षही दोनदा साजरं केलं जातं. १ जानेवारी आणि चांद्र दिनदर्शिकेनुसार. त्याला ‘सेओलाल’ असं म्हणतात. या नववर्षाची तारीख प्रत्येक वेळी बदलते. या दिवशी दक्षिण कोरियात सार्वजनिक सुटी दिली जाते.